’नो रुल्स’ हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा, 50 जणांना घेतले ताब्यात

गाझियाबाद : वृत्त संस्था – गाझियाबादच्या कौशांबी येथील एका ’नो रुल्स’ हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी 50 हून अधिक तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, कौशांबी भागातील एन्जेल मॉलमधल्या एका रेस्टॉरन्टमध्ये अवैध पद्धतीने हुक्का पार्लर सुरू आहे. तसेच तिथं ग्राहकांना दारुही उपलब्ध केली जात आहे, अशी माहिती खबर्‍यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धडक कारवाई करत तरुण-तरुणीना ताब्यात घेतले आहे.

नशेसह इथे अधिक गर्दीमुळे करोना संक्रमणाचा धोकाही वाढला होता. ’नो रुल्स’ नावाच्या या रेस्टॉरन्टमध्ये पोलिसांना दारु आणि हुक्के आढळले आहेत. काही तक्रारी आणि माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने इथे धाड टाकली. रेस्टॉरन्टमध्ये असलेल्या गर्दीकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नव्हते. तसेच अनेकांनी मास्क देखील वापरले नव्हते, असे आढळून आले.

गाझियाबादचे पोलिस अधीक्षक (शहर) अभिषेक वर्मा यांनी याबाबत माहिती दिली. कौशांबी भागातील एन्जेल मॉलमधल्या ’नो रुल्स’ नावाच्या एका रेस्टॉरन्टवर ही कारवाई केली आहे. इथे दारु देखील ग्राहकांना उपलब्ध होत होती. छाप्यात 50 हून अधिक तरुण-तरुणी आढळले आहेत. महामारी कायदा आणि इतर कायद्याच्या कलमान्वये सर्वांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत, असेही गाझियाबादचे पोलिस अधीक्षक (शहर) अभिषेक वर्मा यांनी सांगितले आहे.

अलाहाबादच्या उच्च न्यायालयाने लखनऊ खंडपीठानं राज्यात हुक्का पार्लरवर बंदी आणली आहे. कोणत्याही प्रकारच्या रेस्टॉरन्ट आणि कॅफेमध्ये हुक्का बार चालवण्याची परवानगी दिली जाऊ नये, असे आदेश उच्च न्यायालयाने मुख्य सचिवांना दिले आहेत.