UP पोलिसांचा धक्कादायक व्हिडीओ समोर, ‘विकास दुबे कानपूर ना पहुंचे’ !

कानपूर : वृत्तसंस्था – गँगस्टर विकास दुबे याला मारण्यासाठी पोलिसांचं अगोदरच प्लॅनिंग झालं होतं का ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे असा प्रश्न निर्माण करणारा एक ऑडिओ व्हिडीओ पुरावाच समोर आलाय. या व्हिडीओत एक पोलीस अधिकारी दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याशी विकास दुबेबद्दल बोलताना दिसत आहे. ‘विकास दुबे कानपूर ना पहुंचे’ असं व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. यावरून पोलिसांनी विकास दुबे कानपूरला पोहचेल याची खात्री नव्हती, असं दिसून येत आहे.


आठ पोलिसांची हत्या करून फरार झालेल्या विकास दुबेला गुरुवारी मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला शुक्रवारी पहाटे उज्जैन येथून कानपूरला आणण्यात येत होतं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कानपूरच्या बर्रा भागात स्पेशल टास्क फोर्सच्या गाड्यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. अपघाताची संधी साधत विकास दुबेनं एसटीएफच्या एका अधिकाऱ्याच्या हातातून पिस्तुल हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुबेनं पोलिसांवर गोळीबारही केला. त्यानंतर प्रत्युरादाखल पोलिसांनी देखील गोळीबार केला. यामध्ये दुबेचा मृत्यू झाला. तसेच चार पोलीस जखमी झाल्याचे कानपूरचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली.
दरम्यान, या घटनेबाबत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी, ही गाडी उलटली नाही तर अनेक गुपितं उघड होण्याच्या भीतीने वाचवण्यात आली असं ट्विट केलं आहे. तर गुन्हेगाराचा शेवट झालाय, पण गुन्हा आणि त्याला संरक्षण देणाऱ्या लोकांचं काय ? असं म्हणत प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी-राजकीय लागेबंध्यांवर निशाणा साधला आहे.

एन्काऊन्टर संदर्भात उपस्थित होणारे प्रश्न
पोलिसांच्या दाव्यानुसार, गाडी पलटल्यानंतर दुबेनं 2-3 किलोमीटर पर्यंत पळण्याचा प्रयत्न केला. सोबत एका पोलिसाच्या हातातून हिसकावलेली पिस्तुलही त्याच्याकडे होती. पण आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या गुंडाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना पोलिसांनी त्याला गाडीत कशा पद्धतीनं बसवलं होतं ? रात्री दुबेला घेऊन प्रवास करताना पोलीस बेफिकीर कसे राहिले ? दुबेच्या अटकेनंतर त्याला शुक्रवारी कोर्टासमोर हजर करण्यात येणार होतं, अशावेळी त्यानं पळण्याचा प्रयत्न का केला ? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.