वरिष्ठ अधिकाऱ्यानेच 25 हजाराची लाच देणाऱ्या कनिष्ठ अधिकाऱ्याला दिले पकडून

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या मिल जुल के खायेगे असा शिरस्ता जवळपास सर्व ठिकाणी असतो. कर विभागात तर अनेक किचकट नियमामुळे लाच खाण्यासाठी अनेक मार्ग संगनमताने चोखाळले जातात. पण, धुळे येथील एका घटनेने अजूनही काही प्रमाणिक अधिकारी असल्याचे आशादायक चित्र दिसून आले आहे. राज्य कर विभागातील एका वरिष्ठाने लाच घेण्याचे टाळलेच पण तसा प्रयत्न करीत असलेल्या आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडून दिले. राज्यातील ही गेल्या काही महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याला २५ हजार रुपयांची लाच देताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून राज्यकर अधिकारी वर्ग २ चे प्रविण अशोक भडक (वय ४६, रा. चैतन्यनगर, गोळीबार टेकडी, धुळे) यांना रंगेहाथ पकडले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणारे राज्य कर विभागात अधिकारी आहेत. जयदिप ट्रेडिंग कंपनीला १ लाख ७४ हजार १४३ रुपयांचा टॅक्स क्रेडिट देऊ नये, असे अमरावतीचे वस्तू व सेवा कर विभागाचे सहआयुक्त यांचे पत्र होते. या कंपनीला टॅक्स क्रेडिट रक्कम मंजूर करुन देण्यासाठी प्रविण भडक हे आपले वरिष्ठ अधिकारी असलेल्या तक्रारदारांवर दबाव आणत होते. तसेच लाच देऊ करत होते. तक्रारदार यांना ते काम करणे चुकीचे वाटत असल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

या तक्रारीची मंगळवारी पंचासमक्ष पडताळणी केली असताना प्रविण भडक यांनी जयदिप ट्रेडिंग कंपनीला टॅक्स क्रेडिट मंजूर करुन देण्यासाठी तसेच मेसर्स पुरुषोत्तम सोमनाथ कोतकर व जोगेश्वरी कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्याचा कर थकीत असल्यामुळे  यांनी त्यांची बँक खाती गोठविली होती. ती पुन्हा सुरु करण्यासाठी प्रविण भडक यांनी तक्रारदार यांना २५ हजार रुपये लाच देऊ केली होती. त्यानंतर धुळे येथील वस्तू व सेवा कार्यालयात सापळा रचून प्रविण भडक यांना २५ हजार रुपये लाच देताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाच देणाऱ्या आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्याला पकडून देणारी ही दुर्मिळ घटना आहे.

Visit : Policenama.com