तिकीट न मिळाल्याने ‘त्याने’ केला फोन आणि ओझर विमानतळावर उडाली खळबळ

नाशिक : हैदराबादला जाण्यासाठी एका प्रवाशाने ऑनलाईन बुकींग केले़ मात्र, बुकिंग करताना काही तांत्रिक अडचण आल्याने त्याचे बुकिंग होऊ शकले नाही. त्या रागातून त्याने पोलीस कंट्रोलला फोन केला़ अन त्यामुळे ओझर विमानतळावर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले.

ऑनलाईन तिकीट बुकिंग न झाल्याने हा तरुण विमानतळावर गेला. तेथे विमान कंपनीच्या कर्मचार्‍याबरोबर वाद घातला़ कर्मचार्‍याने त्याला दुसरे तिकीट काढायला सांगितले. पण त्याने तिकीट न काढता हुज्जत घालून तो ओझर विमानतळाबाहेर आला. त्याने रागाच्या भरात नाशिक ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करुन हैदराबाद येथे जाणार्‍या एका विमानात बॉम्ब असल्याचे सांगितले. त्यानंतर तातडीने बॉम्बशोधक व नाशिक पथकाने ओझर विमानतळ गाठले. सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरुन विमानाची तपासणी करण्यात आली. यावेळी विमानामध्ये कुठल्याही प्रकारची बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे कोणीतरी हा खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे पोलिसांनी निनावी फोन करणार्‍याचा शोध सुरु केला. तोपर्यंत या उच्चभ्रु प्रवाशाने ओझर येथून पळ काढला होता.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक प्रवासी काऊंटरवरील कर्मचार्‍यांशी वाद घालत असल्याचे दिसून आले. त्यावर प्रवाशाचे वर्णन व ज्या मोबाईलवरुन पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. तो क्रमांक पोलिसांनी ट्रॅक करुन त्याला नाशिक शहरातून शनिवारी रात्री १० वाजता ताब्यात घेतले. त्याच्याकडे अफवा पसरविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सुरक्षिततेच्या कारणास्तव जी डी सी ए च्या गाईडलाईन प्रमाणे सर्व प्रकारची तपासणी करुन त्यानंतरच विमान उड्डाणाला परवानगी देण्यात आली. या प्रकाराने प्रवाशांचे मात्र रात्री उशिरापर्यंत हाल झाले़.