इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी सेलिब्रिटी घेतात कोट्यावधी रूपये अन् होतात ‘मालामाल’, ‘हे’ कलाकार अव्वल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे जगभरात सर्वसामान्य नागरिकांपासून ते बड्या उदयोजकांना आर्थिककोंडीला सामोरे जावे लागत आहे. मात्र, इन्स्टाग्रामवर एकेक पोस्ट करुन हे सेलिब्रिटी कोट्यवधी रुपये कमवितआहेत. बॉलिवूड स्टार एकेका सिनेमासाठी जेवढे मानधन घेतात, तेवढे पैसे तर या इन्स्टाग्राम सेलिब्रिटीला एक पोस्ट करुन मिळत आहेत. सोशल मीडिया क्षेत्रातली एक कंपनी असलेल्या हॉपर एचक्यूने जगभरातील इन्स्टाग्रामवर सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रिटींची यादी प्रकाशित केली आहे.

यावर्षीच्या यादीत हॉलिवूडचा अभिनेता, निर्माता आणि निवृत्त कुस्तीपटू ड्वेन जॉन्सन पहिल्या क्रमांकावर आहे. मागच्या वेळी म्हणजे 2019 च्या यादीत त्याचा सहावा क्रमांक होता. तर 2019 मध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिकेतली टीव्ही सेलिब्रिटी केली जेनर होती. ड्वेन जॉन्सनने इन्स्टाग्रामवर 18 कोटी 73 लाख फॉलोअर्स आहेत तर तर एका इन्स्टा पोस्टची त्याची कमाई 10 लाख 15 हजार अमेरिकी डॉलर्स आहे. भारतीय रुपयांमध्ये आजच्या विनिमय दरानुसार 7 कोटी 66 लाख रुपये होतात.

हॉपर एचक्यू डॉट कॉमच्या टॉप 100 सेलिब्रिटी लिस्टमध्ये दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या केली जेनरचे 18 कोटी 15 लाख फॉलोअर्स आहेत, तिच्या एका इन्स्टा पोस्टची कमाई 9 लाख 86 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात 7 कोटी 44 लाख रुपये आहे. विराट कोहलीचे 6 कोटी 42 लाख फॉलोअर्स असून त्याच्या एका इन्स्टा पोस्टची कमाई 2 लाख 96 हजार डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 2 कोटी 23 लाख 33 हजार 954 रुपये आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्राचे 5 कोटी 40 लाख फॉलोअर्स असून तिच्या एका पोस्टची कमाई 2 लाख 89 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात 2 कोटी 18 लाख रुपये आहे.