‘या’ 5 हार्मोन्समुळं कधीही वाढतं महिलांचं वजन ! ‘असं’ करा कंट्रोल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अनियमित जीवनशैली, बसून काम, मासिक पाळी, गरोदरपणा अशा अनेक कारणांमुळं महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं आणि वजन वाढण्याची समस्या उद्भवते. अनेकदा काही प्रयत्न करूनही वजनात फरक होत नाही कारण हार्मोन्सचा नकारात्मक प्रभाव पडत असतो. हे हार्मोन्स कोणते आहेत आणि महिलांनी यासाठी काय काळजी घ्यावी यासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत.

1) इंसुलिन – रक्तातील इंसुलिनची पातळी वाढल्यानंही वजन वाढतं. यामुळं टाईप 2 डायबिटीजचाही धोका निर्माण होतो. यासाठी साखर, मद्य, आणि इतर अनहेल्दी पदार्थांचं सेवन करणं टाळावं.

2) थायरॉईड – या ग्रंथी शरीरातील 3 हार्मोन्स प्रभावीत करतात. यामध्ये टी 3, टी 4 आणि कॅल्सिटोनिन यांचा समावेश असतो. या हार्मोनचं काम मेटाबॉलिजम, झोप, वाढ आणि हार्ट रेट नियंत्रित करणं हे असतं. या हार्मोन्सचा अभाव झाल्यानं थकवा आणि वजन वाढणं या समस्या येतात.

3) कोर्टीसोल – हे स्टेरॉईड हार्मोन आहे. याची लेवल वाढल्यानंतर भूक लागणं, वजन वाढणं अशा समस्या उद्भवतात. यासाठी रोज व्यायाम आणि योगा करणं गरजेचं आहे.

4) प्रोजेस्टेरॉन – जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर शरीरातील प्रोजेस्टेरॉन आणि अॅस्ट्रोजन या हार्मोन्सचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. ताण-तणाव, मेनोपॉज, असंतुलित आहार यामुळं प्रोजेस्टेरॉनची लेवल कमी होते.

5) टेस्टोस्टेरॉन – याचं महिलांच्या शरीरातील प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेत कमी असतं. हाडांना मजबूत करणं, शरीरातील फॅट्स जाळणं, कामेच्छा वाढवणं यासाठी हा हार्मोन महत्त्वाचा असतो. रोजच्या जीवनातील वाढत्या ताण-तणावामुळं या हार्मोनची लेवल कमी होते. यामुळंही वजन वाढतं. ही समस्या दूर करायची असेल तर फिट राहणं आवश्यक आहे. यासाठी व्यायाम आणि संतुलित आहार गरजेचा आहे.