कोल्हापूरः पोकलॅनच्या बकेटचा फावडा कचरा वेचणार्‍या महिलेच्या मानेत घुसला, 3 तासांनी शीर कचर्‍यात सापडले

कोल्हापूरः पोलीसनामा ऑनलाइनः कचऱ्याचे विलगीकरण करताना जेसीबीच्या बकेटचा दात मानेत घुसल्याने महिलेचे शीर धडावेगळे झाल्याची दुदैवी घटना कोल्हापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. रविवारी (दि. 18) सकाळी कसबा बावडा येथील झुम प्रकल्पावर ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोकलॅनवरील दोघा चालकांना ताब्यात घेतले आहे.

मंगल राजेंद्र दावणे (वय 60, रा. तिरंगा चौक, आठ नंबर शाळेनजीक, शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कसबा बावडा येथील कचरा प्रकल्पावर शहरातील कचरा टाकला जातो. रविवारी सकाळी काही महिला ढिगा-याजवळ कच-यात स्क्रॅप शोधत होत्या. त्यावेळी डंपीग ग्राऊंडच्या ठिकाणी जेसीबीद्वारे कचरा विलगीकरण करताना कच-याच्या ढिगामागे खड्ड्यात मंगल दावणे ह्या स्क्रॅप शोधत होत्या. पोकलॅन चालकाला ढिगा-यामागे काही न दिसल्याने त्याने नेहमीप्रमाणे कचरा उचलला. त्याचवेळी बकेटचे दात मंगल दावणेंच्या मानेत घुसल्याने त्याचे शीर धडावेगळे झाले. धड कचऱ्याच्या खड्ड्यात राहीले तर शीर कचऱ्यासह उचलून इतर ढिगाऱ्यात टाकले गेले. काहीवेळाने हा प्रकार चालकाच्या लक्षात आला. त्यावेळी त्याला कचऱ्याच्या खड्यात महिलेचे फक्त धडच दिसले. त्यानंतर 3 तास कच-यात शोधकाम केल्यानंतर गायब झालेले शीर सापडले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.