यमुना एक्सप्रेसवर भीषण अपघात; ऑईल टँकरने दुभाजक तोडून कारला दिलेल्या धडकेत 7 जणांचा जागीच मृत्यु

मथुरा : उत्तर प्रदेशातील यमुना द्रुतगती महामार्गावर तेलाच्या टँकरने दुभाजकाला ओलांडून समोर आलेल्या कारला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील सर्व ७ जणांचा जागीच मृत्यु झाला. मथुरा येथील नौझील पोलीस ठाण्याच्याजवळ मंगळवारी रात्री उशिरा हा अपघात झाला.

तेलाचा टँकर हा आग्राकडे जात होता. वेगाने जाणार्‍या या टँकरचालकाचे नियंत्रण सुटले व टँकरने दुभाजकाला धडक दिली़ दुभाजक तोडून तो विरुद्ध दिशेच्या मार्गावर आला़ समोरुन येणार्‍या कारला त्याने जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील सर्व ७ जणांचा जागीच मृत्यु झाला.

या अपघातात कारमधील सर्व ७ जणांचा मृत्यु झाला असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. अपघातातील मृत हे हरियानातील रहिवासी होते. पीडितांच्या कुटुंबियांना मृत्युच्या घटनेची माहिती देण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक गौरव ग्रोव्हर यांनी सांगितले.