नाष्टा उधार न दिल्याने कुर्डूवाडीत भाजप कार्याध्यक्षाची गुंडागर्दी, हॉटेलची केली तोडफोड

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन

कुर्डूवाडी भाजपचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी एका हॉटेलमध्ये तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. हॉटेल मालकाने उमेश पाटील यांना नाष्टा उधार न दिल्याने तोडफोड करत हॉटेल चालकास शिवीगाळ केल्याचे समजते. तसेच कॅन्टीनमधील दिवसभराचा झालेला पैशाचा गल्लाही घेऊन निघून गेले आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुर्डूवाडी बायपास रोडवरील डॉ.लोंढे हॉस्पिटल समोरील विजया लक्ष्मी हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. हॉटेल मालक निलेश राजु सावणे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यावरून उमेश पाटील, फयाज दाळवाले, विराज सातारकर, सुहास सरडे, किरण, बालाजी, राहुल, कारंजकर अशा एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तोडफोडीत अंदाजे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समजतेय.

कुर्डुवाडी भाजप कार्याध्यक्षाची मस्तीची भाषा

उमेश पाटील हॉटेलमध्ये आले असता त्यांनी उधार नाष्‍टा मागितला. त्यावर निलेश सावणे यांनी म्हणाले, उधार मिळणार नाही रोख पैसे द्यावे लागतील. ‘तू मला ओळखत नाही का, तुला मस्ती आली का? असे म्हणत उमेश पाटील यांनी निलेश यांना शिवीगाळ केली. यांनतर त्यांच्यासोबत आलेल्या इतर सहकार्‍यांनी हॉटेलची तोडफोड केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीसांकडून सुरु आहे.