संतापजनक ! कोरोनाबाधित महिलेसोबत छेडछाड केल्याच्या आरोपावरून हॉटेलच्या मेडिकल कोऑर्डिनेटरला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईच्या अंधेरीतील एक धक्कादायक घटना घडली आहे. अंधेरीतील विट्स हॉटेलमध्ये विलगीकरणात असणारी एक कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मेडिकल कॉर्डिनेटरला अटक केली आहे. हि घटना मंगळवारी १३ एप्रिलला एमआयडीसी परिसरात घडली आहे.
सरफराज मोहम्मद अकबर खान (वय, ३७ कल्याण ) असे या आरोपीचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, हि महिला नवी मुंबई येथील कामोठे ठिकाणी पती, मुलगा आणि सासूसमवेत राहते. महिलेचा पती बँकेत नोकरीस आहे. तर घरातील सर्व सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे अंधेरीच्या विट्स हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं होत. महिला आणि तिचा मुलगा हॉटेलमध्ये क्वारंटाईन होते. आणि पती, सासू तपासणीसाठी दवाखान्यात दाखल केले. नंतर १२ एप्रिलला महिलेने डिस्चार्ज मिळण्यासाठी हॉटेलच्या लोकांना विनंती करून घरी विलगीकरणात राहीन असे म्हटले. त्यानंतर हॉटेलमधील एका महिलेने तिला सरफराजचा नंबर देऊन तोच समन्वयाचं काम करतो असं म्हटलं.

या माहितीवरून तर त्या पॉझिटिव्ह असणाऱ्या महिलेने त्याला फोन केला तेव्हा हॉटेलमध्ये येऊन बोलू असं सांगून तो काही वेळातच तिथे पोहोचला. आम्ही तुम्हाला असा डिस्चार्ज देऊ शकत नाही, यासाठी आपल्याला डीएमशी बोलावं लागेल असे म्हणून तो निघून गेला. यांनतर काही वेळाने सरफराज तिथे आला. यावेळी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तू रुमबाहेर जावं असं तिने सरफराजला सांगितलं. जर मी तुला डिस्चार्ज मिळवून दिला तर काय करु शकतेस असं म्हणत तो तिची छेड काढू लागला. तसेच त्याने महिलेकडे शरीर सुखाची मागणी देखील केली. महिलेने याचा विरोध करत त्याच्यापासून सुटका केली.

या दरम्यान, त्या महिलेने म्हटलं की मी याची तक्रार पती, कुटुंबीय आणि हॉटेलच्या लोकांना करणार आहे. यावरून आरोपी सरफराज घाबरला आणि तिला डिस्चार्ज देण्यास तयार झाला. सोबतच तक्रार न करण्याची विनंती देखील केली. या प्रकारावरून महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी सरफराजला कलम ३५४ (अ) आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीला कोर्टाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी दिली आहे.