सराईत गुन्हेगारांकडून घरफोडीचे 27 गुन्हे उघड, 23 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना पुणे गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २७ गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून तब्बल २३ लाख रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १४) करण्यात आली.

जितसिंग उर्फ जितु राजपालसिंह टाक (वय-२३ रा. वैदवाडी, पुणे), हुकुमसिंग रामसिंग कल्याणी (वय-२८ रा. रामटेकडी, हडपसर), अंगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (वय-३४ रा. रामटेकडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी पुणे शहरातील कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२, सिंहगड रोड-५, वारजे-३, भारती विद्यापीठ, दत्तवाडी, डेक्कन, हवेली, स्वारगेट या पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक आणि मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ घरफोडीचे गुन्हे केले आहेत.

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी हडपसर परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर आणि अतुल साठे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हडपसर परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी कोथरुड येथील विनायक खाडे यांच्या बंद घराचे कुलुप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेल्याची कबुली दिली. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी २७ गुन्ह्यांची कबुली दिली.
Pune-police1
जप्त केलेला मुद्देमाल
४७० ग्रॅम (४७ तोळे) वजनाचे सोन्याचे दागिने, ४०८० ग्रॅम (४ किलो) वजनाचे चांदीचे दागिने, एक कार, एक दुचाकी, गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या दोन कटावणी, एक बोल्ट कटर, दोन स्क्रू ड्रायव्हर असा एकूण २३ लाख २७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट -३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, राजकुमार केंद्रे, पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर, प्रविण तापकीर, संदीप तळेकर, अतुल साठे, अनिल शिंदे, संदीप राठोड, रोहीदास लवांडे, शकील शेख, राहुल घाडगे, दत्तात्रय गरुड, दिपक मते, किशोर शिंदे, रामदास गोणते, सचिन गायकवाड, गजानन गानबोटे, कैलास साळुंखे, कल्पेश बनसोडे, विल्सन डिसोझा, नितीन रावळ यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त