पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरुच, ४ ठिकाणी घरफोड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच असून हडपसर, विमानतळ, चंदनगर आणि धनकवडी या ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे.

चंदननगर परिसरात भरदिवसा घरफोडी करून दोन लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. या प्रकरणी अनिरूद्ध वसंत जाधव (वय ३३, रा. चंदननगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंदननगर येथील लेन क्रमांक आठमधील गणपती मंदिरामागे राहतात.

त्यांचे घर बुधवारी सकाळी साडेअकरा ते सायंकाळी सातपर्यंत त्यांचे घर बंद होते. त्या वेळी अज्ञाताने त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ८९ ग्रॅम सोन्याचे दागिने, १० ग्रॅम चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ४५०० रुपये असा एकूण दोन लाख ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी चंदननगर पोलिस तपास करत आहेत.

सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत धनकवडीतील सुयोग हॉस्पिटलजवलळील कोणार्क विहारमध्ये चोरी झाली. येथील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. त्या वेळी अज्ञाताने घरातील एक लॅपटॉप आणि एक मोबाइल असा १८ हजार रुपयांचा ऐवज चोरला.

विमाननगर परिसरातील राजीवनगर येथील साउथ दामिनी बंगल्यात घरकाम करणाऱ्या मोलकरणीने एक लाख ३० हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा आरोप घरमालकाने केला आहे. या प्रकरणी विमाननगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर येथील गोंधळेनगर भाजी मंडई परिसरात दार उघडेच असलेल्या एका घरात अज्ञाताने प्रवेश करून, ५३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले.