एखाद्या पत्त्यांचा बंगला पडावा अगदी तसाच क्षणात होत्याचं नव्हतं झालं, बंगलाच कोसळला (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात सध्या जोरदार मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व ठिकाणी महापुराची परिस्थिती तयार झालेली आहे. पावसाचा जोर किती मोठा आणि प्रचंड आहे हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.

उत्तर प्रदेशमधील बालीयामधील कहापूर गावामध्ये एक घर अवघ्या काही क्षणांमध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. या व्हिडिओमध्ये पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे एक घर दिसत आहे. सिमेंट काँक्रीटचे घर अवघ्या काही क्षणांमध्ये कोलमडून पडते. या दूर्घटनेमध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

सतत पडणाऱ्या पावसामुळे येथील जमीन दलदलीसारखी झाली आहे. त्यामुळेच खालची जमीन मऊ झाल्याने हे घर एखाद्या पत्त्यांचा बांगला कोसळावा तसे कोसळले आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावरील ही घटना आहे. गंगानगर गावातील २०० गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या ठिकाणी गुडघाभर पाणी साचून होते.