गृहिणींच्या अपेक्षा वाढल्या, 10 पैकी 9 जणी म्हणतात पुरुषांनीही घरकामात हातभार लावावा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात सगळीकडे लॉकडाऊन लागू करण्यात आला. या काळात घरातली सगळी माणसं घरातच होती. घरकामामुळे बायका वैतागल्या होत्या. त्यामुळे थोडासा हातभार लागावा म्हणून अनेक पुरुष घरकामात बायकांना मदत करताना दिसले. मात्र आता अनलॉक झाल्यानंतरही गृहिणींच्या अपेक्षा उंचावलेल्या दिसून येत आहेत. पुरुषांनीही घरकामात हातभार लावावा, असे मत जेमीनी ऑईलने केलेल्या सर्व्हेक्षणात 10 पैकी 9 गृहिणीनी मांडले आहे.

तरुण गृहिणीमध्ये अशा विचार सर्वाधिक असल्याचे दिसून आले. गृहिणींच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी इग्निटींग अ‍ॅस्पायरेशनने हे सर्व्हेक्षण केले होते. राज्यातील 10 पैकी 6 गृहिणी स्वयंकापातील वेळ वाचवूून स्वतःच्या आवडी- निवडी जपायला आवडेल असे सांगितले.

घरकामातून किमान अर्धातास मिळाला तरी आपण आवडी- निवडी जपू, त्यासाठी कुटुंबियांकडून फक्त पाठिंबा मिळायला हवा, अशी इच्छा 37 टक्के गृहिणीनी व्यक्त केली आहे. तर 40 ते 45 वयोगटातील 61 टक्के महिला त्यांचा बहुतांश वेळ घरातील कामे, विशेषतः स्वयंपाक आणि मुलांची काळजी घेण्यात घालवत असल्याचे आढळून आले. सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या 60 टक्के महिला फक्त गृहिणी न राहता, त्यापलीकडे काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.