डाळींचे भाव गगनाला, तूरडाळ 102 रुपये किलो

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – मागील एका आठवड्यापासून डाळीमध्ये तेजी निर्माण झाली असल्याने, डाळींच्या भावात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली पाहायला मिळत आहे. एका आठवड्यात डाळीचे भाव गगनाला भिडले आहे. तर तब्बल १० ते १२ रुपये वाढून १०० रुपयांच्या वर गेले आहेत. ८८ ते ९० रुपये घाऊक बाजारात असणारी तूरडाळ १०१ ते १०२ रुपयापर्यंत गेली आहे. तसेच स्टॉकिस्ट सक्रिय झाल्याने येणाऱ्या काही दिवसांत आणखी भाववाढ होण्याची शक्यता जाणकराकडून सांगण्यात येत आहेत.

दरम्यान, स्टॉकिस्ट आणि डाळ मिल यांची मागणी वाढली. कर्नाटकमध्ये तूर आवक घटली. मुंबई पोर्टवरील लेमन तूर ही संपत आल्याने देशी तुरीची मागणी वाढली. अशी अनेक कारणे आहेत की, ज्यामुळे तूर व तूरडाळ यांच्यात जबरदस्त वाढ आली आहे. मूग मोगर घाऊक बाजारात १०० रुपयांवर गेला, तर मसूरडाळ ७२ रुपये, उडीदडाळ १०० रुपये, चणाडाळ ५४ रुपये, मूगडाळ चिल्टा ८८-९१ रुपयांपर्यंत गेला आहे.

याशिवाय तेलात सोयाबीन १२० रुपये किलो, सूर्यफूल १३५ रुपये लिटर, फल्लीतेल १५० रुपये लि. घाऊक बाजारात विक्री सुरू आहे. साखरेच्या दरातही ५० ते ७० रुपये अशी वाढ झाली आहे. तांदळामध्ये ४०० ते ५०० रुपये वाढ झाल्याने कोलम तांदूळ पाच हजारांवर पोहोचला आहे. याशिवाय गव्हामध्ये १०० ते २०० रुपये प्रतिक्विंटल वाढल्याने रवा, आटा, मैदा याचे भाव वाढले आहे. जनावरांसाठी वापरण्यात येणारी सरकी ढेप दोन हजारांवरून अडीच हजारांपर्यंत पोहोचली आहे. तर भविष्यात आणखी भाववाढीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.