पॉप स्टार रिहानाचं राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ‘कौतुक’, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हॉलिवूड सिंगर, पॉप स्टार, अ‍ॅक्ट्रेस रिहाना (Rihanna) सध्या टीकेची धनी बनताना दिसत आहे. तिनं शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिल्यानं तिच्यावर टीका केली जात आहे. काहींनी तिला पाठींबाही दिला आहे. बॉलिवूडसह अनेक इंटरनॅशनल स्टार्सनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेते तिला सपोर्ट करत आहेत तर काही विरोध करताना दिसत आहेत. राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तिचं समर्थन केलं आहे. तिची भूमिका आपल्याकडील तमाम सेलिब्रिटींच्या तोंडात मारणारी आहे असं ते म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गरिबीतून वर आलेल्या रिहानाला दीनदुबळ्या घटकांबद्दल अजूनही आस्था आहे. पैसा आणि प्रसिद्धीमुळं ती संपलेली नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल आवाज उठवून तिनं हे दाखवून दिलं आहे. तिची ही भूमिका मिठाची गुळणी धरून बसलेल्या तमाम सेलिब्रिटींच्या तोंडात मारणारी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी रिहानाचं कौतुक करत इतर सेलिब्रिटी आणि भाजप कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे.

भक्तांची तर पार गोची झाली. तिला देशद्रोही म्हणता येत नाही की नक्षलवादी. पाकिस्तानात जा म्हणूनही सांगता येत नाही. “तू आमच्या अंतर्गत बाबीत कशाला ढवळाढवळ करतेस” असा दुबळा प्रतिकार काहींनी केला. त्यावर, “अबकी बार ट्रंम्प सरकार” बोंबलत आपले नेते तिथे कशासाठी गेले होते? ती अमेरिकेच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ नव्हती का? असा सवालही आव्हाड यांनी केला आहे.

रिहानाला आवाजाची निसर्गदत्त देणगी होती. तिच्या शाळेत तिने गायलेलं गाणं एका अमेरिकन म्युझिक कंपनीच्या मालकाने ऐकून तिला तिथे बोलावली. “म्युझिक ऑफ द सन” हा तिचा पहिला अल्बम २००३ साली प्रसिद्ध झाला तेव्हा ती फक्त १५ वर्षांची होती. तो इतका गाजला आणि खपला की तिथून तिने मागे वळूनच पाहिलं नाही. आज वयाच्या ३२ व्या वर्षी ती अब्जोपती आहे. जगभरात तिचे कोट्यवधी चाहते आहेत असं म्हणत त्यांनी तिचं कौतुक केलं आहे.