पुणे अन् पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासासंदर्भात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा, जाणून घ्या

पुणे : पोलिसानामा ऑनलाइन – पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकाससाठी समितीची स्थापना करणार असून समितीच्या अभ्यासानंतर या दोन्ही शहरांच्या क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासाचे पारदर्शी काम उभे केले जाणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज (शनिवार) पुण्यात दिली. जितेंद्र आव्हाड यांनी आज झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला भेट देऊन विविध पुनर्वसन प्रकल्प तसेच प्राधिकरणाच्या कामांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी मोठी घोषणा केली.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत प्राधिकरणाच्या कार्यालयात आढावा घेतला. यावळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजीव कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे अयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अयुक्त श्रावण हार्डीकर, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

माजी सनदी अधिकाऱ्यांची समिती
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या सनदी अधिकाऱ्यांनी यापूर्वी काम केले आहे, ज्यांनी शहरांच्या विकासासाठी योगदान दिले आहे, अशा माजी सनदी अधिकाऱ्यांचा सहभाग घेत एक समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. या समितीमध्ये शहराच्या विकासात योगदान देणारे इतर जाणकार प्रतिनिधींचा देखील समावेश असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून या समितीची तसेच झोपडपट्टी पुनर्विकासाच्या कार्याला अंतीम स्वरूप देण्यात येणार आहे.

दोन्ही शहरात पारदर्शी मॉडेल तयार करणार
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्विकासाचे नवीन पारदर्शी मॉडल तयार करून गती देणार असल्याचे सांगतानाच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या वतीने झोपडपट्टीवासियांना पुढील काही महिन्यात ओळखपत्र देण्याचा विचार असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी मांडलेल्या मागण्यांसंदर्भात गृहनिर्माण विभागाच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन जितेंद्र आव्हाड यांनी दिले.

जितेंद्र आव्हाड यांनी झोपडपट्टी विकासाच्या धोरणांची वाटचाल, योजना अंमलबजावणीची प्रक्रिया, झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची सद्य:स्थिती, तेथील अडचणी, शासनाचे अर्थसहाय्य, झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन, अंतर्भूत प्रकल्प, सध्याची स्थिती, अडकलेले प्रकल्प, प्रस्ताव आदी विषयांसह शहरातील मध्यवस्तीतील बाजारपेठेच्या अडचणी, त्या सोडवण्याच्या दृष्टीने आढावा घेतला.