‘भाजपच्या कार्यकर्त्यांकडे 50 हजार Remdesivir इंजेक्शन आले कोठून?’

अहमदनगरः पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना रेमडेसिविरचे 1 इंजेक्शन मिळविण्यासाठी नाकीनऊ येत आहेत. असे असताना भाजपच्या कार्यकर्त्यांकडे 50 हजार इंजेक्शन येतात कोठून? असा सवाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला आहे.

युवक काँग्रेसच्या वतीने संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे आयोजित रक्तदान शिबिरात तांबे बोलत होते. ते म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील आरोग्याची स्थिती गंभीर बनली आहे. सामान्य माणसांची उपचारासाठी धावपळ सुरू आहे. सोन विकून ऑक्सिजन घेण्याची वेळ आली असून याला मोदी सरकार जबाबदार आहे. केवळ सामान्यच नव्हे तर श्रीमंत लोकांचेही हाल सुरू आहेत. अशा वाईट काळातही भाजपचे नेते राजकारण करीत आहेत. काल मुंबईत रेमडेसिविरच्या 60 हजार इंजेक्शनचा साठा लपवून ठेवलेल्या एका कंपनीच्या मालकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले. तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर त्याच्या सुटकेसाठी ठाण्यात धाव घेतली. हे इंजेक्शन त्यांनी राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी ठेवली होती. जेथे सामान्य माणसाला एक इंजेक्शन मिळणे अवघड आहे, अशा वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडे 50 इंजेक्शन येतात कशी? हे अतिशय खालच्या पातळीवरील राजकारण असल्याचे ते म्हणाले.