Remdesivir : रेमडेसिवीर टंचाईसाठी मंत्री राजेंद्र शिंगणेही जबाबदार

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन बेड्स, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान रेमडेसिवीर इंजेक्शनच्या टंचाईसाठी जबाबदार धरून अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. रेमडेसिवीर टंचाईसाठी एकट्या अधिकाऱ्याला दोषी कसं धरता येईल? मंत्री राजेंद्र शिंगणे यांनाही जबाबदार धरा कारण अधिकारी मंत्र्याच्या सुचनेनुसार काम करत असतो, असा टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. दरम्यान काळे यांच्या जागी परिमल सिंग यांनी रात्री उशिरा एफडीए आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्याचे समजते.

 

 

 

 

बीडीआर कंपनीला महाराष्ट्रात रेमडेसिविरचा पुरवठा करण्याची तातडीने परवानगी द्यावी, असा आग्रह मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ मंत्र्याने धरला होता. या कंपनीने कोणतीही परवानगी मागितलेली नसताना किंवा त्यांचा आपल्याकडे अर्जदेखील नसताना, त्यांना परवानगी कशी द्यायची, असा मुद्दा उपस्थित झाला होता. मात्र आपल्याला इंजेक्शनची गरज आहे, तातडीने त्यांना परवानगी द्यावी, असा आग्रह संबंधित मंत्र्यांनी धरला होता. शेवटी एफडीए आयुक्त काळे यांनी बीडीआर कंपनीने तोंडी विनंती केलेली आहे. ती गृहीत धरून त्यांना आम्ही परवानगी देत असल्याचे पत्रक काढले होते. कागदपत्रे तुम्ही तातडीने सादर करावीत, असे त्या पत्रात नमूद केले होते. त्याच वेळी अन्य कंपन्यांनादेखील तुम्ही तातडीने अर्ज करा, आम्ही तुम्हाला परवानगी देतो, अशी भूमिका एफडीए आयुक्त काळेंनी घेतली होती. दरम्यान बीडीआर आणि ब्रूक दोन्ही कंपन्यांना गुजरात आणि दमण प्रशासनाने राज्याबाहेर इंजेक्शन विक्रीला बंदी घातली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांच्या आग्रहावरून तातडीने परवानगी दिलेली ब्रूक कंपनी व काही ज्येष्ठ मंत्र्यांनी सुचवलेली बीडीआर या दोन्ही कंपन्यांनी महाराष्ट्राला अद्याप एकही इंजेक्शन दिले नसल्याची माहिती समोर आली आहे.