कशी झाली आशालता वाबगावकरांना ‘कोरोना’ची लागण ? उपचारादरम्यान झालं निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   आज ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं उपचारादरम्यान निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. काल त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्या व्हेंटिलेटरवर होत्या. त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांचे निधन झालं.

अनेक मराठी चित्रपटांमध्ये आशालता यांनी चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अनेकदा त्या आईच्या भूमिकेत दिसल्या. नाटकांपासून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. त्यांनी 100 हून अधिक मराठी व हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्या सध्या एका खासगी मनोरंजन वाहिनीवरील ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेचं शूटिंग करत होत्या. साताऱ्यातील लोणंद येथे या मालिकेचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी मुंबईतून एक डान्स ग्रुप तेथे चित्रीकरणासाठी गेला होता.त्यातून कोरोनाचा फैलाव झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जात आहे.

आई माझी काळुबाई ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातच चित्रीकरणादरम्यान आशालता यांच्यासह 27 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या मालिकेत अलका कुबल देवी काळूबाईची भूमिका साकारत आहेत. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठीतील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या सोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

आशालता यांची कारकीर्द

रंगभूमीवरील प्रवास

मत्सगंधा, गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, छिन्न, महानंदा

रुपेरी पडद्यावरील प्रवास

आशालता यांनी 100 हून अधिक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
जंजीर (1973), चलते चलते (1976), आहिस्ता आहिस्ता (1981), अपने पराये (1981), उंबरठा (1982), शौकीन (1982), लव्ह इन गोवा (1983), कूली (1983), सदमा (1983), हमसे है जमाना (1983), वहिनीची माया (1985), शराबी (1984), अंकुश (1986), गंमत जंमत (1987), घायल (1990), माहेरची साडी (1991), फौजी (1996), अग्नीसाक्षी (1996), बेटी नंबर 1 (2000), सनराईज (2014)