कोरेगाव भीमा : शरद पवारांची भूमिका अचानक बदलली कशी ?, भाजपचा राष्ट्रवादीवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भंडारी यांनी हा आरोप केला आहे.

या दंगलीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या जबाबदार नेत्यांनी टीका केली आहे. मात्र या याप्रकरणी तपास करणाऱ्या चौकशी आयोगापुढे सादर केलेल्या शपथपत्रात मात्र पवार यांनी आपण या संदर्भात कोणा व्यक्ती अथवा संघटनेवर आरोप करू इच्छित नाही असे स्पष्टपणे नमूद केले होते असा आरोप त्यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या तपासाबाबत वक्तव्य केली जात आहेत. पवार यांनी या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे ( एसआयटी) सोपवावा, अशी मागणी केली होती. सध्या हा तपास राज्य पोलिसच करत आहेत. हेच पवार या घटनेची चौकशी एनआयएकडे सोपविण्याच्या केंद्राच्या निर्णयावरही टीका करत आहेत, मग पवार यांचा नेमका विश्वास आहे तरी कोणावर असा सवालही माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

तसेच याच शपथपत्रात पवार यांनी समाज माध्यमांवर निर्बंध आणण्याची मागणी केली होती असेही माधव भंडारी यांनी यावेळी लक्षात आणून दिले आहे.

देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी विधानसभेत निवेदन केले होते. त्यात त्यांनी कुठेही कथित आरोपी माओवादी होते, असा उल्लेख केलेला नव्हता. ज्या चौकशा केल्या, त्यात पी. बी. सावंत यांनी आपण जे बोललो नाही. ते आपले स्टेटमेंट म्हणून दाखल करून घेतले आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सगळ्याची चौकशी करण्याची गरज होती, असे शरद पवारांनी सांगितले आहे.