‘सोमेश्वर’ने 3 हजार रूपये अंतिम दर कसा दिला ?, जिल्हाध्यक्ष सतिश काकडे यांचा सवाल

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – सोमेश्वर सह. साखर कारखान्याने मागील हंगामात ३ हजार ३०० रूपये प्रति मे. टन अंतिम दर दिला होता. यावर्षी सर्वच गोष्टीमध्ये सोमेश्वर पुढे असल्यामुळे ३ हजार ३०० रूपये प्रति मे. टनापेक्षा निश्चित जादा भाव मिळेल अशी अपेक्षा सभासदांना असताना सोमेश्वर कारखान्याने मात्र ३ हजार रूपये प्रति मे. टन अंतिम दर कसा दिला ? असा सवाल शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतिश काकडे यांनी केला आहे.

सोमेश्वरनगर (ता.बारामती) येथील श्री. सोमेश्वर सह. साखर कारखान्याने गळीत हंगाम सन २०१९ – २० चा अंतिम ऊस दर ३ हजार रूपये प्रति मे.टन व कामगारांनाही उच्चांकी बोनस १५ टक्के जाहिर केल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कृती समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त करीत टीका केली आहे.

काकडे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले कि, श्री सोमेश्वर कारखाना कर्ज मुक्त झाला आहे असे वेळोवेळी सांगुन चेअरमन यांनी स्वतःची पाठ थोपटुन घेतली असा आरोप करून मागील तीन वर्षापासुन उच्चांकी उत्पन्न घेतल्यामुळे सोमेश्वर कारखाना एक नंबरचा ऊस दर देणार असे चेअरमन बढाय्या मारत होते. तसेच माळेगाव कारखाना निवडणुकीत देखील सोमेश्वर जादा अंतिम दर देईल असे आश्वासन दिले होते .

साखर विक्री, उपपदार्थांंची विक्री चढ्या भावाने केलेली होती. वीज विक्री सुध्दा चांगली झालेली आहे. तसेच २० कोटी रूपये चढ उतार निधी कपात केलेला आहे. त्यामुळे शेतकरी कृति समिती किमान ३ हजार ५०० रूपये प्रति मे.टन अंतिम ऊस दर बसत आहे यावर ठाम आहे. परंतु चेअरमन यांनी उच्चांकी ३ हजार रूपये प्रति मे.टन ऊस दर व कामगारांना १५ टक्के बोनस जाहिर केल्याने ३ हजार अंतिम दर कसा जाहीर केला असा सवाल शेतकरी कृति समितीचे जिल्हाध्यक्ष सतिश काकडे यांनी केला आहे.

गेल्या ५ ते ७ वर्षात कारखान्याने सुमारे ६१ कोटी ३२ लाख रूपयांची भांडवली गुंतवणुकीची कामे केलेली आहेत. आत्ता प्रस्तावित विस्तारवाढीची सुमारे १४२ कोटी ६५ लाख रूपयांची कामे कारखाना करणार आहे. तसेच आजपर्यंतचे १३३ कोटी रूपयांचे कर्ज कारखान्यावर आहे असे अंदाजे एकुण २७५ कोटी रूपयांचे कर्ज कारखान्यावर होणार असुन व त्यावरील घसारा व व्याजा पोटी प्रति मे.टन ४०० रूपये सभासदांच्या ऊस बिलातुन कपात होईल अशी भिती सतिश काकडे यांनी व्यक्त केली.

चेअरमन यांनी स्वत:च दि. ३१/७/२०२० रोजीच गाळप हंगाम २०१९ – २० चा अंतिम उस दर ३ हजार रूपये प्रति मे.टन संचालक मंडळ व सभासदांना अंधारात ठेवुन फाईनल केला होता व त्याप्रमाणे विस्तारवाढीचा प्रस्ताव आर्थिक पत्रकांसह साखर आयुक्त कार्यालयात सादर केला होता. तसेच जाणीव पुर्वक बॉयलर अग्निप्रतिपादन व गव्हाण पुजन कार्यक्रमात अंतिम उस दर ३ हजार रूपये फाईनल केलेला असताना देखील तो संचालक मंडळास व सभासदांना सांगितले नाही असे काकडे यांनी म्हटले आहे.

विस्तारवाढी बाबत जेष्ठ सभासद व तज्ञांंशी चर्चा करण्याचे आवाहन
संचालक मंडळाचा दोन ते तीनच महिने कार्यकाळ राहिला असल्याने चेअरमन विस्तारवाढी बाबत घाई का करत आहेत ? का त्यांना त्यांचा कार्यकाळ संपण्या आगोदर विस्तारवाढीच्या काही ऑर्डर द्यायच्या आहेत का ? असा सवाल उपस्थित करून कारखान्याचे चेअरमन यांनी कारखान्याचे जेष्ठ व अभ्यासु सभासद, संचालक मंडळ, व्ही. एस. आय. चे अधिकारी तसेच कृती समिती यांच्या बरोबर विस्तारवाढी व इतर बाबी संबंधी तात्काळ मिटींग घेवुन चर्चा करावी व नंतरच विस्तारवाढी संबंधीचा अंतिम निर्णय घ्यावा असे आवाहन सतिश काकडे यांनी केले आहे.