जेलच्या गेटमधून गजा मारणेची मिरवणुक निघालीच कशी ? कारागृह प्रमुख सुनिल रामानंद यांच्याकडून चौकशीचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दोन खूनाच्या खटल्यात तळोजा कारागृहात असलेल्या कुख्यात गुंड गजानन मारणे याला कारगृहातून सोडण्यात आले. यावेळी त्याच्या स्वागताला तळोजा कारगृहाबाहेर हजारो समर्थक आले होते. यावेळी तळोजा कारागृहाच्या आवारात गजा मारणेची मिरवणूक काढण्यात आली. यानंतर प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे याची करागृहाच्या आवारात मिरवणूक निघालीच कशी ? याची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे कारागृह महानिरिक्षक सुनील रामानंद यांनी दिले आहेत.

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात गजा मारणे यांची निर्दोष सुटका झाल्यानंतर त्याची नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका झाली. यावेळी त्याच्या समर्थकांनी सिने स्टाईल गजा मारणाचे स्वागत केले. यावेळी कारागृहाच्या गेटमधून गाडीत उभा राहून हात उंचावत मोठ्या थाटात गजा मारणे बाहेर आला. यावेळी जेलसमोरुनच त्याच्या गुंडांनी वाजत गाजत मिरवणूक काढली.

सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना देखील केवळ दहशत पसरवण्यासाठी गजा मारणे याच्या समर्थकांनी तळोजा जेल ते पुण्यापर्यंत ही मिरवणूक काढली. यावेळी रॅलीमध्ये जवळपास पाचशे पेक्षा अधिक वाहने सहभागी झाली होती. एवढेच नाही तर उर्से टोल नाक्यावर फटाके वाजवून आरडाओरडा करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. यानंतर प्रसारमाध्यमांनी या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उदात्तीकरणावर टीकेची झोड उठवल्यानंतर पोलिसांनी गजा मारणे याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली.

आता जेल प्रशासनालाही जागं झालं असून तळोजा जेल परिसरातील गुंडाच्या शक्तीप्रदर्शनाची चौकशी केली जाणार आहे. गुंडाच्या गाड्या तळोजा जेलच्या आवारात सोडण्यात आल्याच कशा ? त्याठिकाणी शक्ती प्रदर्शन करुच कसं दिलं ? याची सखोल चौकशी होणार आहे. भायखळा कारागृह विभागाचे विशेष महानिरीक्षक यांच्यामार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. तपासाअंती संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे कारागृह प्रमुख सुनिल रामानंद यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.