वाळूमाफिया आणि पोलिसांचे संबंध उघड

जिंतूर (परभणी) : पोलीसनामा ऑनलाईन – अवैध वाळूची वाहतूक करणाऱा ट्रॅक्टर उपजिल्हाधिकाऱ्यांनी पकडला. यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने थेट उपजिल्हाधिकाऱ्यांना ट्रॅक्टर का पकडला असा जाब विचारला. त्यामुळे पोलिसांचे आणि वाळूमाफियांचे संबंध उघडकीस आले आहेत. हा प्रकार सोमवारी पहाटे घडला. पोलीस कर्मचाऱ्याने जाब विचारल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात जाऊन संबंधीत पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाईल जप्त करुन त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्याचे आदेश पोलीस निरीक्षकांना दिले आहेत.

उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी जिंतूर शहरात पहाटे साडेचारच्या सुमारास ट्रॅक्टरमधून (एमएच २७-००९८) अवैधरीत्या वाळुची वाहतूक होत असल्याचे पाहून त्यांनी ट्रॅक्टर पकडला. या कारवाईनंतर ट्रॅक्टरचालकाने जिंतूर येथील पोलीस निरीक्षकांच्या वाहनचालकाला कोणी तरी आपला ट्रॅक्टर पकडला आहे, असे मोबाईलवर सांगितले. त्या वाहनचालकाने मोबाईल ट्रॅक्टर पकडणाऱ्याकडे द्या, असे सांगितल्यानंतर ट्रॅक्टर चालकाने उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मोबाईल दिला. तेव्हा ट्रॅक्टर पकडणारे तुम्ही कोण? आणि ट्रॅक्टर कसा काय पकडला? असा सवाल उपजिल्हाधिकाऱ्यांना केला. त्यावर पारधी यांनी आपण उपजिल्हाधिकारी आहोत, असे सांगितले.

या प्रकरणानंतर पारधी यांनी थेट पोलीस ठाणे गाठून वाहनचालकाचा मोबाईल जप्त करून त्यातील सर्व रेकॉर्र्डिंग जप्त केले. पोलीस निरीक्षकांना बोलावून घटनेचा पंचनामा केला आणि या संदर्भातील अहवाल वरिष्टांना पाठविण्याच्या सूचना केल्या. या प्रकारामुळे पोलिसांचे वाळूमाफियांशी आर्थिक संबंध उघड झाले. जप्त करण्यात आलेल्या पोलीस कर्माचाऱ्याच्या मोबाईलमध्ये महत्त्वाचे रेकॉर्डिंग मिळाले आहे. या रेकॉर्डिंगमध्ये वाळूमाफियांशी संबंध असणे, पैशांची मागणी व इतर अनेक महत्त्वपूर्ण १८ रेकॉर्र्डिंग महसूल अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष जप्त केल्या आहेत.