भाजपच्या आयटी सेल प्रमुखाला निवडणूक आयोगाचे ‘काम’ ?, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  केंद्रीय निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्ष अर्थात भाजप आयटी सेलचे काम करणार्‍या पदाधिकार्‍याला ‘काम’ दिले आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी चव्हाण यांनी केली आहे.

मुंबईमध्ये आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्ला केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपच्या आयटी सेलचे काम करणार्‍या देवांग दवे याला निवडणूक आयोगाचे आयुक्तांचे फेसबूक पेज ऑपरेट करण्याचे काम दिले आहे. देवांग दवे हा भाजपचा कार्यकर्ता देखील आहे. त्याला निवडणूक आयोगाचे काम कुठल्या आधारावर आणि का दिले? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थितीत केला आहे.

भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख ’देवांग दवे आहे. तो भारतीय जनता मोर्चाचा पदाधिकारी देखील आहे. त्याने एक खासगी कंपनी स्थापन करून हा सगळा प्रकार केला आहे. तो स्वत:हा मेंबर आय टी बोर्ड ऑफ महाराष्ट्र असे सांगत होता. मी मुख्यमंत्री असताना असे कोणतेही बोर्ड तेव्हा नव्हते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे’, अशी मागणी देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

’या सर्व प्रकरणात कुठल्या तरी पक्षाला मदत करत असल्याचे समोर आले आहे. या डेटा कंपनीने कुणा-कुणाला मदत केली? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे’, असे यावेळी चव्हाण यांनी सांगितले.

तसेच ’देशात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत राम मंदिरापेक्षा कोरोना संकटाशी लढा देणे हे आपले प्रथम प्राधान्य आहे, हे शरद पवार यांचे मत योग्यच आहे’, असे सांगत चव्हाण यांनी समर्थन केले आहे. त्यामुळे आता काँग्रेसने देखील राष्ट्रवादीच्या बाबींशी मिळते जुळते मत व्यक्त केले आहे. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेतेय? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

सरकारमध्ये वाद नाहीत, आम्ही एकत्र आहोत

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा या तिन्ही पक्षाचे सरकार आहे. अनेक विभाग, बदली, अनेक योजना असतात त्यावर चर्चा होते. लोकशाहीमध्येच चर्चा होत असते. सरकारमध्ये कुठेही वाद नाहीत. आम्ही एकत्र आहोत. उलट भाजपकडून सरकारमध्ये वाद हा अपप्रचार केला जात आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.