वाहन पाण्यात बुडालय मग ‘नो-टेन्शन’, असे मिळवा विम्याचे पैसे, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दक्षिण पुण्यात आलेल्या पुरामुळे हजारो वाहने पाण्यात बुडाली. ट्रेझर पार्कमध्ये दीड हजारहून अधिक वाहने पाण्यात पुर्णपणे बुडाली होती. तर के के मार्केटच्या पार्किंगमध्येही शेकडो वाहने अडकली होती. तसेच विविध रस्त्यांवर शेकडो वाहनांचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या पाण्यात बुडालेल्या वाहनचालकांपुढे आता या नुकसानग्रस्त वाहनांचा विमा कसा मिळवायचा याचा प्रश्न आहे.

आपण लाखो रुपयांची गाडी घेतो, त्या गाडीचा विमा असतो. त्या विम्यामध्ये काय काय समाविष्ट आहे, याची मालक माहिती करुन घेत नाही. गाडीला नुकसान झाले तर विमा कसा मिळवायचा याची माहिती अनेकांना नसते. कोणी ती करुन घेण्याचा प्रयत्नही गाडी घेताना करत नाही. त्यामुळे अनेकदा एखादी दुर्घटना झाल्यानंतर त्यातील अटींचे पालन न झाल्याने नुकसान भरपाई मिळण्यास प्रॉब्लेम येतो.

पार्किंगमध्ये उभ्या गाडीत पाणी शिरल्यास, गाडी गाळात रुतली असल्यास ती चालू करण्याचा प्रयत्न करु नये. तसा प्रयत्न केल्यास इंजिन फेल होते व कार खराब होण्याचे दुसरेच कारण गाडी दाखविते. ती अन्य वाहनांच्या माध्यमाच्या सहाय्याने उचलून गॅरेजमध्ये अथवा सर्व्हिर सेंटरला न्यावी. त्याचा ही खर्च विमा कंपनीकडून मिळतो. गॅरेजला गाडी नेल्यानंतर पाहणी करुन काय नुकसान झाले आहे. किती खर्च येणार याची माहिती द्यावी, या कामाच्या संभाव्य खर्चाविषयी विमा कंपनीला माहिती दिल्यास त्यांच्याकडून सर्व्हेअर नेमला जातो. बऱ्याचदा वाहनांचे इतके नुकसान झालेले असते की, ते हलविताच येत नाही़, अशावेळी सर्व्हेअर नेमला जातो. तो परिस्थिती पाहून माहिती कंपनीला देतो, त्यानंतर त्याचा पंचनामा होतो. दावा दाखल करताना ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक, विम्याची कागदपत्रे बरोबर जोडावी लागतात.

बऱ्याच कारच्या इंजिनांमध्ये कचरा अडकला असून पाणीही शिरले आहे. त्यामुळे सायलेन्सरमध्ये पाणी गेले असल्यास गाडी सुरु करण्याचा प्रयत्न करु नका. शक्ततो कार, वाहन आहे त्याच स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास कार, दुचाकीचा फोटो काढून ठेवा. विमा कंपनीला झालेल्या घटनेची माहिती त्वरीत दया, ही माहिती ई मेल किंवा साध्या अर्जाद्वारे कळवा.

गाडीवर झाड पडून, विजांच्या गडगडाटामुळे नुकसान झाल्यास, वादळामुळे वाहने उडून वाहून गेल्यास वाहनांची कागदपत्रे गहाळ होण्याची भिती असते. अशा वेळी शक्यतो अशा परिस्थितीचा व्हिडिओ किंवा फोटा काढून ठेवा. फोटो काढणे शक्य नसल्यास ज्यांकडे फोटो मिळणे शक्य आहे, त्यांच्याशी संपर्क साधा. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले फोटोही ग्राहक दाव्यात जोडू शकतात.

अशा घटनेत वाहनांची कागदपत्रे नष्ट झाल्यास ती आरटीओकडून पुन्हा मिळू शकतात. विमा कंपनीकडूनही कागदपत्रांची कॉपी मिळू शकते. अशा प्रकारात संपूर्ण नुकसान भरपाईचा दावा दाखल करता येतो.
नुकसान झालेल्या वाहनांचा दावा दाखल करताना घटनेच्या दिवशी विमा अस्तित्वात होता का हे पाहणे गरजेचे आहे. विमा देताना काही अटी शर्ती नमूद केलेल्या असतात. त्या माहिती असणे आवश्यक आहे. वाहनांची कागदपत्रे नष्ट झाली असेल तर घाबरुन न जाता विमा कंपनीकडून ती मिळविता येतात.
जर विमा कंपनीने क्लेम दाखल केल्यानंतरही तो नाकारला तर तक्रारदार ग्राहक मंचाकडे दावा दाखल करु शकतो.

Visit : Policenama.com