घसा बसणं म्हणजे नेमकं काय ? घसा बसू नये म्हणून आणि बसल्यानंतर काय करावं ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पावसाळा सुरू झाल्यानंतर किंवा इतर वेळी देखील अनेकांना घसा बसण्याचा त्रास होतो. घसा बसतो म्हणजे नेमकं काय आणि हा त्रास टाळण्यासाठी काय करावं, तसंच घसा बसल्यानंतर काय काळजी घ्यावी याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

घसा बसतो म्हणजे नेमकं काय होतं ?
जेव्हा आपल्या घशाला जंतूंचा संसर्ग होतो तेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती जंतूंना मारण्यासाठी कार्य करू लागते. या प्रक्रियेत त्या ठिकाणी जास्त प्रमाणात पांढऱ्या पेशी जमा होतात आणि सूज येते. सूज आल्यानंतर घशात काहीतरी आहे असं वाटणं, घसा दुखणं आणि गिळताना त्रास होणं, आवाज बदलणं अशी लक्षणं दिसू लागतात. यालाच आपण घसा बसणं असं म्हणतो. इतर काही कारणांमुळं देखील घसा बसू शकतो. परंतु सामान्यपणे जंतूसंसर्ग हेच कारण अधिक प्रमाणात दिसून येतं.

घसा बसू नये म्हणून काय करावं ?
पावसाळ्यात घसा बसू नये यासाठी मुळात रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अनेकदा रोगप्रतिकारक शक्ती चांगली असली तरीही हवामानात झालेल्या बदलांमुळं जंतूसंसर्ग होऊ शकतो. जर तु्मची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर त्याची तीव्रता कमी होऊ शकते. नियमित व्यायाम करणं, चांगला आहार घेणं, सर्व प्रकारच्या भाज्या-फळांचा आहारात समावेश करणं, पुरेसं पाणी पिणं आणि एकूणच जीवनशैली चांगली ठेवणं खूप गरजेचं आहे.

घसा बसल्यानंतर काय करावं ?
1) घसा बसल्यानंतर त्याची लक्षणं पाहून उपचार केले जातात. या काळात रुग्णानं दगदग करू नये. विश्रांती घेणं चांगलं. भरपूर पाणी प्यावं. तसंच, सूप, आलं, गवती चहा घातलेला चहा आणि इतर गरम पेयं घेत रहावी. गरम पेयांमुळं घशाला चांगला शेक मिळतो आणि शरीरातील पाण्याचं प्रमाणंही चांगलं राहतं.

2) विषाणू संसर्गामुळं घसा दुखणं, ताप येणं यावर रुग्णाच्या प्रकृतीनुसार साधी पॅरसिटमॉलची गोळी किंवा लहान मुलांना पॅरसिटमॉल सिरप देता येईल. काही जण अशा वेळी ब्रूफेनच्या (आयब्यूजेसिक) गोळ्या घेतात. परंतु यामुळं विषाणू संसर्ग वाढण्याची शक्यता असते असं एक अभ्यास सांगतो. त्यामुळं यावेळी ब्रूफेन शक्यतो देऊ नये. पॅरसिटमॉल अधिक चांगलं आहे.

3) घसा बसल्यानंतर गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. पाणी उकळून प्यावं. बाहरचे पदार्थ खाणं टाळावं.

4) घशाच्या विषाणूसंसर्गानंतर झालेला जीवाणू संसर्ग 4-5 दिवस बरा होत नसेल किंवा थोडा बरा होऊन पुन्हा वाढत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

5) मलेरिया आणि डेंग्युच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप येणं, घसा दुखणं, घसा खवखवणं, ही लक्षणं दिसतात. परंतु नंतर लक्षणांची तीव्रता बदलत जाते. ताप खूप तीव्र असणं, अंगदुखी अतिशय वाढणं अशी लक्षणं दिसू लागतात. त्यामुळं तापात वेळीच डॉक्टरांना दाखवणं योग्य आहे.

6) काही लोकांना दमट हवेत तयार होणाऱ्या बुरशीची ॲलर्जी असते. त्यामुळं देखील घसा बसू शकतो. अशा व्यक्तींनी ॲलर्जी आटोक्यात ठेवणं आवश्यक आहे. घरातील आणि कार्यालयात भिंतींवर ओल न येऊ देणं, ओले आणि दमट कपडे धुतल्याशिवाय न घालणं या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.