अखेर गोवा भारताचा भाग कसा आणि कधी बनला ? खूपच ‘रोचक’ इतिहास, जाणून घ्या

पणजी : वृत्तसस्था – गोवा कोणाला माहिती नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. जगभरात आपल्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी गोवा ओळखला जातो. दरवर्षी देश विदेशातून लाखो पर्यटक पर्यटनासाठी येथे येत असतात. 1947 मध्ये ब्रिटीशांकडून भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी त्यावेळी गोवा भारताचा भाग नव्हता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 14 वर्षानंतर गोव्याला स्वातंत्र्य मिळाले. गोव्याचा इतिहास खूपच रंजक आहे.

पोर्तुगीजांनी 1510 मध्ये पहिल्यांदा गोवा ताब्यात घेतला आणि त्यानंतर त्यांनी सुमारे 450 वर्ष याठिकाणी राज्य केलं. 1 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांकडून स्वतंत्र झाला, परंतु पोर्तुगीज गोव्याला सहजपणे सोडायला तयार नव्हते. यासाठी भारताला कठोर वृत्ती स्वीकारावी लागली.

स्वातंत्र्यानंतर पोर्तुगीजांनी गोवा भारताकडे सोपवावा अशी विनंती करण्यात आली होती. परंतु त्यांनी ही विनंती फेटाळून लावली. गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी भारताकडे आता फक्त दोनच मार्ग होते. पहिला युद्ध करून गोवा ताब्यात घेयचा किंवा सत्याग्रहातून. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि गाधीजींना दुसरा पर्याया चांगला वाटला.

गोव्याला स्वतंत्र करण्यात डॉ. राम मनोहर लोहिया यांचे मोठे योगदान आहे. 1946 मध्ये ते गोव्यात गेले, त्या ठिकाणी पोर्तुगीज इंग्रजांपेक्षा जुल्मी असल्याचे त्यांनी पाहिले. गोव्यातील लोकांची छळवणूक होत होती. तेथील नागरिकांना सभा घेऊन आपले मत व्यक्त करण्याचा देखील अधिकार नव्हता. हे सर्व लोहिया यांना सहन झाले नाही आणि त्यांनी तात्काळ 200 लोकांची सभा बोलावली. पोर्तुगीजांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी लोहिया यांना 2 वर्षे तुरुंगात डांबले. पण लोकांच्या रोषामुळे त्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. पोर्तुगीजांनी लोहिया यांना 5 वर्षे गोव्यात येण्यास बंदी घातली असली तरी गोव्याचा स्वातंत्र्यलढा सुरुच राहीला.

1961 मध्ये भारत सरकारने पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा मुक्त करण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबरमध्ये पोर्तुगीज सैन्याने गोवा मच्छिमारांवर गोळीबार केला, यामध्ये काही मच्छीमारांचा मृत्यू झाला. यानंतर सर्व काही बदलले. भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री व्हि.के कृष्णा मेनन आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी आपत्कालीन बैठक बोलावली. आणि अखेर 17 डिसेंबर ला हा निर्णय घेतला गेला की गोवा मुक्त करण्यासाठी त्याठिकाणी 30 हजार भारतीय सैनिक पाठवायचे. या ऑपरेशनला ‘ऑपरेशन विजय’ असे नाव देण्यात आले. या ऑपरेशनमध्ये नौदल आणि हवाईदल यांची देखील मदत घेण्यात आली.

भारतीय सैन्यांची ताकत पाहून पोर्तुगालने 36 तासाच्या आत गुडघे टेकले आणि गोवा सोडण्याचा निर्णय घेतला. 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीज जनरल मॅन्युअल अँटोनियो वासोलो ए सिल्व्हा यांनी आत्मसमर्पण करण्याच्या दस्तावेजावर सही केली. अशाप्रकारे गोवा 450 वर्षानंतर पोर्तुगीजांपासून स्वतंत्र झाला आणि भारताचा अविभाज्य भाग बनला.