Kargil Vijay Diwas : भारतानं कारगिलचं युध्द कसं जिंकलं, जाणून घ्या घटनाक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 21 वर्षापूर्वी म्हणजे 26 जुलै 1999 मध्ये भारताने कारगिलमध्ये पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवला. याची आठवण म्हणून आज 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून देशात साजरा केला जातो. भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मिरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तान सैन्यात युद्ध झाले. मे, जून आणि जुलै असे सलग तीन महिने हे युद्ध सुरु होते. या युध्दामध्ये भारताच्या 527 जवानांना वीरमरण आले. तर भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या 450 सैनिकांना कंठस्नान घातले. 1999 च्या कारगिल युध्दामध्ये नेमके काय घडले आणि भारताने पाकिस्तानचा कसा पराभव केला, याचा घटनाक्रम.
3 मे 1999 – पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याची माहिती भारतीय सैन्याला मिळाली.

10 मे 1999- पाकिस्तानने द्रास, काकसार आणि मुशकोह या परिसरात घुसखोरी केल्याचे उघड झाले.
26 मे 1999 – भारतीय वायुदलाने घुसघोरी झालेल्या परिसरात एअर स्ट्राईक केला. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर हवाई तळावरून मिग 21, मिग 23, मिग 27, मीराज 2000 या लढाऊ विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले.
5 जून 1999 – पाकिस्तानी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे पुरावे भारताने जाहीर केले.
10 जून 1999- पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैन्यांचे होते.
13 जून 1999 – भारतीय सैनिकांनी द्रास परिसरातील तोलोलिंग परिसरावर कब्जा मिळवला.
15 जून 1999 – अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानला कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली.
4 जुलै 1999 – तब्बल 11 तासांच्या धुमश्चक्रीनंतर भारताने टायगर हिल्सवर पुन्हा कब्जा केला.
5 जुलै 1999 – भारतीय सैनिकांनी द्रास परिसरावर ताबा मिळवला.
7 जुलै 1999 – भारतीय सैन्याने बटालिक परिसरावर पुन्हा कब्जा केला.
11 जुलै 1999 – पाकिस्तानने कारगिल परिसरातून सैन्य माघारी घेण्यास सुरुवात केली.
14 जुलै 1999 – भारताकडून ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा करण्यात आली.
26 जुलै 1999 – कारगिल युद्धाच्या समाप्तीची औपचारिक घोषणा झाली.