कोरोना लस ठरतेय ‘संजीवनी’, केंद्र सरकारने दिला पुरावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढ आहे. कोरोनाला रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्याला आता तीन महिने पूर्ण झाले आहे. आता देशामध्ये 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस दिली जाणार. तरी काही लोकांच्या मनामध्ये लसीसंदर्भात शंका आहे. कोरोना लस घेतल्यानंतर कोरोना झाल्याची प्रकरणे समोर आल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे लोक कोरोना लस घेण्यास संकोच करत आहेत. देशात कोरोना लसीकरण सुरु झाल्यापासून आतापर्यंत किती लोकांना लस घेतल्यानंतर कोरोना झाला याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. केंद्राने जाहीर केलेली संख्या पाहता कोरोना विरुद्धची लस प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आजपर्यंत 13 कोटीपेक्षा अधिक जणांना कोरोनाचा डोस देण्यात आला आहे. कोवॅक्सिनचे 1.1 कोटी डोस देण्यात आले आहेत. या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर केवळ 4 हजार 208 आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 695 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. कोविशिल्ड लसीचे 11.6 कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी 17 हजार 145 लोकांना पहिला डोस घेतल्यानंतर आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 5014 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. लस घेतलेल्या लोकांच्या तुलनेत लस घेऊन कोरोना झालेल्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. तसंच लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही, पण त्याची तीव्रता कमी होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, कोरोना लस घेणं म्हणजे तुम्हाला कोरोनापासून पूर्ण सुरक्षा मिळते असे नाही. तर गंभीर आजारापासून संरक्षण मिळते. तुम्हाला कोरोना झाला तरी तो गंभीर स्वरुपाचा होत नाही. त्याची लक्षणे गंभीर होत नाहीत, आणि परिणामी मृत्यू टाळता येऊ शकतात. लस घेतल्यानंतर तुमची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी तुम्ही सुरक्षित आहात. मात्र, लस घेतली म्हणून बेफिकीरपणे वागून चालणार नाही, मास्क घालणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना कोरोनाची लागण होणार आहे, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.