तुम्ही मतदान नाही केल्यास देशाला ‘एवढं’ नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान १८ एप्रिलला होणार आहे. पार पडलेल्या पहिल्या टप्प्यात ९१ जागांसाठी मतदान झाले तर दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यातील ९७ जागांसाठी मतदान होणार आहे. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावा यासाठी निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जातात. परंतु कितीही जनजागृती केली तरी मतदानाचा आकडा काही ठिकाणी वाढतच नाही.

अनेक वेळा मतदार माझ्या एका मताने काय फरक होणार असा विचार करून मिळाल्या सुट्टीला बाहेरगावी फिरायला जातात. मतदान न करता तुम्ही फिरायला जाता मजामस्ती करता, परंतु तुम्ही मतदान केले नाही तर तुमचे स्वत:चेच नाही तर देशाचे देखील नुकसान करत असता. देशातील पहिली लोकसभा निवडणूक १९५२ ला झाली होती. त्यावेळी १० कोटी ४५ लाख रुपये खर्च आला होता. तर २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी ३ हजार ८७० कोटी रूपये खर्च आला होता. आता सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी ६ हजार ५०० कोटी म्हणजेच २०१४ च्या निवडणूक खर्चाच्या दुप्पट खर्च होण्याची शक्यता आहे.

ज्यावेळी पहिली लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी एका मतदारामागे ०.६० पैशांचा खर्च आला होता. तर २०१४ मध्ये हाच खर्च प्रत्येक मतदारामागे ४६ रुपयांपर्यंत गेला होता. १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारामागे ७२ रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. तुम्ही मतदान न करता स्वत:सह देशाचेही नुकसान करत आहात. जर एका मतदारसंघात एक हजार लोकांनी मतदान केले नाही तर ७२ हजार रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे.