‘कोरोना’ कॉलर ट्युनसाठी ‘बिग बीं’ना किती मानधन ? सरकारनं दिलं ‘हे’ उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या आवाजात आपण गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाची कॉलर ट्युन ऐकत होतो. कोरोना बद्दल जनजागृती करत काळजी घेण्याचं आवाहन यात करण्यात आलं होतं. आता ही कॉलर ट्युन बंद करण्यात आली आहे. ही कॉलर ट्युन बंद झाली आणि 15 जानेवारीपासून आता लसीकरणाची नवीन कॉलर ट्युन सुरू झाली आहे. आता अशी माहिती समोर आली आहे की, बिग बींना त्यांच्या आवाजातील या कॉलर ट्युनसाठी किती मानधन देण्यात आलं आहे याची माहिती सरकारकडे उपलब्ध नाहीये. माहिती अधिकारातून याबाबतचा खुलासा झाला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अ‍ॅड प्रणय अजमेरा यांनी अमिताभ बच्चन यांना या कॉलरट्युनसाठी किती मानधन दिलं जातं याबाबत माहिती मागवली होती. परंतु माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं मात्र याची माहिती उपलब्ध नसल्याचं आपल्या पत्रातील उत्तरात सांगितलं आहे. इतकंच नाही तर मंत्रालयाकडे याबाबतच्या कराराचीही माहिती उपलब्ध नाही असंही त्यांनी कळवलं आहे. त्यामुळं या कॉलर ट्युनच्या खर्चाबाबत आता संभ्रम निर्माण झाल्याचं दिसत आहे. यापूर्वीही केंद्र सरकारनं कोविड 19 संदर्भातील आरोग्य सेतु अ‍ॅपच्या खर्चाबद्दल माहिती उपलब्ध नसल्याचं सांगितलं होतं.

नेतेमंडळीसह अनेकजण कॉलर ट्युनला वैतागले होते

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवातील कोरोनाच्या कॉलर ट्युनला अनेक युजर्स वैतागले होते. ट्युन बंद करण्यासाठी अनेकांनी तक्रार केली होती. काहींनी तर कोर्टात याचिकाही दाखल केल्या होत्या. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही ट्युन काढून टाकून टाकण्याची मागणी केली होती. यामुळं भीती परसत आहे असं त्यांनी म्हटलं होतं. राजस्थानचे काँग्रेसचे आमदार भरत सिंह यांनीही सरकारला पत्र लिहित ट्युन बंद करण्याची मागणी केली होती.