अमेरिकन ‘राष्ट्राध्यक्ष’ Joe Biden यांना किती ‘पगार’ मिळणार, काय असतील ‘सुविधा-अलाऊन्स’, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद हे अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली पद आहे. सामान्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे फेडरल कायद्यानुसार या पदाच्या देखील आपल्या काही मर्यादा आणि सीमा आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पगारापासून त्यांच्या इतर वस्तूंचा खर्च कायद्याने निश्चित केला आहे. 20 जानेवारी रोजी शपथविधीनंतर जो बिडेन (Joe Biden) अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष होतील. राष्ट्रपती म्हणून त्यांचा पगार किती असेल, कोणत्या प्रकारच्या सुविधा मिळतील त्याबाबत जाणून घेऊया.

न्यूयॉर्कची वेबसाइट स्टाईल कॅस्टरच्या मते, अमेरिकन कायद्यानुसार (US Code 3) अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा वार्षिक पगार चार लाख अमेरिकन डॉलर्स आहे. भारतीय चलनानुसार तो सुमारे 2 कोटी 92 लाख रुपये आहे. याशिवाय राष्ट्राध्यक्षांना वर्षाकाठी 50 हजार डॉलर्सचा एक्‍सपेंस भत्ताही मिळतो. याशिवाय एक लाख डॉलर्सचा नॉन टॅक्सेबल प्रवास भत्ता देखील मिळतो.

याशिवाय अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना वार्षिक करमणुकीसाठीही पैसे मिळतात. ही रक्कम 19 हजार डॉलर्स आहे, या रकमेस ते स्वत: आणि आपल्या कुटुंबाच्या मनोरंजनासाठी खर्च करू शकतात. त्याच वेळी, फर्स्‍ट लेडी म्हणजेच राष्ट्रपतींच्या पत्नीसाठी कोणताही पगार नसतो. जॉर्ज वॉशिंग्टन सन 1789 मध्ये अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले, तेव्हापासून पाच वेळेस वेतनात वाढ झाली. अलीकडे 2001 मध्ये, पगारामध्ये 200,000 वरुन 400,000 डॉलर पर्यंत वाढ झाली.

विशेष म्हणजे जरी राष्ट्राध्यक्षांना पगार दिला जात असेल, परंतु हे पद स्वीकारलेल्या सर्वच राष्ट्राध्यक्षांनी पगार स्वीकारलेला नाही. पॉलिटिको (American political journalism company) च्या म्हणण्यानुसार, अमेरिकेचे 31 वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूवर 1917 मध्ये निवडून आले तेव्हा पगाराला नकार देणारे ते पहिले राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी पगार देणगी म्हणून दिला होता.

यानंतर 35 वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनीही 1961 मध्ये निवडून आल्यावर पगार घेण्यास नकार दिला होता. केनेडी पूर्वी काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्य होते, त्यानंतर ते राष्ट्राध्यक्ष झाले, परंतु त्यांनी दोन्ही पदांवर असताना वेतन घेण्यास नकार दिला. खर्च म्हणून त्यांनी फक्त 50,000 खर्च भत्ता त्यांच्याकडे ठेवला. हूवर प्रमाणेच, केनेडी यांनीही आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाचा पगार विविध सेवाभावी संस्थांना दिला.

पगाराबरोबरच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणूनही इतर अनेक भत्ते मिळतात. याशिवाय त्यांना लिमोसीन, मरीन वन आणि एअरफोर्स वनमध्ये मोफत वाहतुकीची सुविधा आहे. याव्यतिरिक्त, व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रपतींना नि:शुल्क निवास मिळते. बिझनेस इनसाइडरच्या मते, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष त्यांची मुदत संपल्यानंतरही सरकारी खर्चावरच राहतात, ज्यात सुमारे 200,000 डॉलर्स इतकी वार्षिक पेन्शन, हेल्थकेअर, सशुल्क अधिकृत भेट आणि एका कार्यालयाचा देखील त्यात समावेश आहे.