जाणून घ्या… कशी ठरतात चक्रीवादळांची नावं ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – १९९९च्या ‘सुपर’ चक्रीवादळानंतरचे सर्वांत विध्वंसक असणारे ‘फनी वादळ’ आज देशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे चक्रीवादळ हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. या चक्रीवादळाला ‘फनी’ हे नाव बांग्लादेशाने दिले आहे. बांग्लादेशात ‘फनी’ला साप म्हटले जाते. धोक्याचा इशारा तातडीने देता यावा आणि वादळांची नेमकी ओळख असावी, या उद्देशाने काही वर्षांपूर्वीपासून वादळांना नाव देण्याचे ठरवले गेले.

चक्रीवादळांना नावे देण्याचा इतिहास –

समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले की हवामान खात्याकडून त्याचे नामकरण केले जाते. पाश्चिमात्य देशांकडून वादळांना नावे देण्याची सुरुवात झाली. सन १९०० च्या दरम्यान वादळांना स्त्रीलिंगी नावे दिली जायची. नंतर ती ‘’ द्यायचे ठरवण्यात आले. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला येणाऱ्या चक्रीवादळाचे नाव ‘ए’ने सुरू व्हायचे. दक्षिण गोलार्धात तयार होणाऱ्या वादळांना पुल्लिंगी नावे देण्याची पद्धत सन १९००च्या अखेरीला सुरू झाली. अटलांटिक उष्णकटिबंधात तयार होणाऱ्या वादळांना १९५३नंतर ‘नॅशनल हरिकेन सेंटर’ने तयार केलेली नावे दिली जाऊ लागली. आता जागतिक हवामानशास्त्र संघटनेची (वर्ल्ड मेटिऑरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन (WMO) आंतरराष्ट्रीय समिती चक्रीवादळांची नावे निश्चित करते.

या ९ भागांमधून ठरवली जातात नावं –

जगभरामध्ये वादळांची नावं ९ भागांमधून ठरवली जातात. उत्तर अटलांटिक, पूर्वोत्तर पॅसिफिक, मध्य-उत्तर पॅसिफिक, पश्चिम-उत्तर पॅसिफिक, उत्तर हिंद महासागर, दक्षिण-पश्चिम हिंद महासागर, ऑस्ट्रेलिया, दक्षिण पॅसिफिक आणि दक्षिण अटलांटिक अशा ९ भागांमधून वादळांची नावं ठरवली जातात. ज्या भागामध्ये चक्रीवादळं तयार होतात त्याच्या आजूबाजूचे देश एकत्र येऊन चक्रीवादळाच्या नावांची यादी तयार करतात आणि मग वादळांना ही नावं ओळीनं दिली जातात.

हिंदीमहासागराच्या हद्दीत येणारी वादळे –

हिंदीमहासागराच्या हद्दीत येणाऱ्या वादळांचे नामकरण प्रामुख्याने भारत , बांग्लादेश, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड हे देश करतात. २००० सालापासून या हद्दीतील वादळांचं नामकरण करण्याची परंपरा सुरू झाली. २००४ साली सर्वदेशांनी यावर सहमती दर्शवली. त्यानंतर प्रत्येक देशाने वादळांसाठी ६४ वेगवेगळी नावं सुचवली. त्यात या ८ देशांनी ८ नाव निवडली. ही सर्व नावांची यादी World Meteorological Organization (WMO) च्याजवळ सुरक्षित आहे. हिंदी महासागराच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक वादळाला या यादीत असलेले नाव देण्यात येते. WMO हे काम करते. हिंदी महासागरातील चक्रीवादळांची नावे नवी दिल्लीतील ‘रीजनल स्पेशलाइज्ड मेटिऑरॉलॉजिकल सेंटर’कडून ठरवली जातात.

वादळांची नावे ठरवण्याचा नियम –

ताशी ६५ किमीपेक्षा अधिक वेगाच्या चक्रीवादळाचे नामकरण होते. नावे देताना कुणाच्या भावना न दुखवण्याची सूचना दिली जाते. महासागरानुसार काही झोन तयार करण्यात आले आहेत. त्या-त्या झोनमधील देशांनी नावे सुचवायची आणि जसजशी चक्रीवादळे येतील. तशी अनुक्रमे येणाऱ्या वादळांना नावे द्यायची हा नियम आहे.