बोगस रेमडेसिव्हीर इंजेक्शन कसं ओळखणार? बॉक्सवर छापील स्वरूपात काय लिहिलेलं असतं? जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने हाहाकार केला असून, कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे आरोग्यावर अधिक भार निर्माण झाला आहे. आरोग्याच्या सोयी, पुरवठा अपुरा पडू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर याची व्यवस्था करणं राज्य आणि केंद्र सरकारसाठी आव्हानात्मक झालं आहे. तर दुसरीकडे अनेक रेमडीसीवीरचा तुटवडा असताना काळाबाजार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. तसेच, बनावट इंजेक्शन तयार करणारे आणि विकणारे अशा घटना देखील समोर आल्या आहेत. म्हणून खरे आणि बोगस रेमडीसीवीर आता ओळखता येणे आवश्यक आहे.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार..
दिल्ली पोलिसांनी रेमडेसिव्हीर संदर्भात जनजागृती अभियानांच्या माध्यमातून बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन बाबत सविस्तर सांगितले आहे. दिल्ली पोलिसांनी एक फोटो ट्विट करत, त्यामध्ये बनावट रेमडेसिव्हीर कसं असंत याविषयी सांगितलं आहे. दिल्ली पोलीस दलातील अधिकारी मोनिका भारद्वाज यांनी बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन तयार करणाऱ्या विषयी काही माहिती दिली आहे की, रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या बॉक्स वर ‘COVIPRI’ हे नाव लिहिलेलं असेल तर ते बनावट रेमडीसीवीर इंजेक्शन असतं. म्हणून अशा नावाचं नमूद असणारे इंजेक्शन खरेदी करू नका, असे म्हटले आहे.
This is #Fake.
No #Remdesivir by the name #COVIPRI exists.
This complete racket has been busted but some injections may still be in circulation. Please do not buy from unverified sources. pic.twitter.com/HncrXgk4Mh— Monika Bhardwaj (@manabhardwaj) May 1, 2021
COVIPRI हे नाव असलेलं बोगस रेमडेसिव्हीर इंजेक्शनची विक्री…
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार असे सांगण्यात आले आहे की, COVIPRI या नावाने कोणत्याही रेमडेसिव्हीर औषधाची विक्री केली जात नाही. बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन तयार करणाऱ्या टोळीचा ‘पर्दाफाश केला गेला आहे. मार्केटमध्ये या बनावट रेमडेसिव्हीर औषधाची विक्री सुरु आहे. काही व्यक्ती फायदा मिळवण्यासाठी नागरिकांच्या आयुष्याशी खेळत आहेत. बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन प्रकरणी आंतरराज्यीय टोळीला अटक केली आहे.
असं ओळखा बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन…
बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन विक्री करणाऱ्यांनी मूळ इंग्रजीमध्ये काही फेरबदल करुन बॉक्सवर छापील स्वरूपात नमुद करण्यात आले आहेत. For used in india. Not for export इंग्रजी व्याकरणाच्या नियमांनुसार हे पूर्णपणे चूक आहे. ‘caution’ म्हणून “It is a dangerous to take this preparation Except under medical supervision” हे लिहिलं आहे. इंग्रजी व्याकरणाच्या दृष्टीनं हे सुद्धा चूक आहे. बॉक्सवर छापण्यात आलेला पत्ता (address) देखील चुकीचा आहे. तर तामिळनाडू येथील मेट्टूपलायम आणि सिक्कीममधील सिंगटममध्ये औषध बनवल्याचा दावा करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.