सेफ्टीसाठी गुगलकडे रेकॉर्ड असणाऱ्या व्हॉईस कमांड्स ‘अशा’ डिलीट करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगल असिस्टंटच्या मदतीने व्हॉईस कमांड्स देऊन अलार्म सेट करणं, हवामानाचा अंदाज घेणं किंवा घरातली इतर उपकरणं हाताळणं यासारखी कामं करता येतात. गुगलकडे युजर्सनी दिलेल्या सर्व कमांड्सचे रेकॉर्डिंग असते. गुगल प्रत्येक व्हॉईस कमांड रेकॉर्ड करत असतं आणि या सर्व कमांड सर्व्हरवर साठवून ठेवलेल्या असतात. यामुळे डेटाच्या खासगीपणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गुगलनं स्टोअर करून ठेवलेल्या कमांड्स सर्व्हरवर साठवून ठेवलेल्या असतात. त्यानंतरही ऐकता येतात. शिवाय गुगलनं कमांड्सवर काय प्रतिक्रिया दिल्या याचं सुद्धा रेकॉर्डिंग केलेलं असतं. ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवेत आवश्यक ते बदल करता यावेत यासाठी हा डेटा सेव्ह केला जातो. असं असलं तरी गुगल असिस्टंटवरील हिस्ट्री डिलिट करण्याचा पर्यायही युजर्सकडे उपलब्ध आहे. युजर्स आपल्या आवाजात सेव्ह असलेल्या कमांड्स कशा डिलीट करायच्या हे जाणून घेऊया.

वेब ब्राउजरवरून ‘अशा’ डिलीट करा व्हॉईस कमांड्स –

कॉम्प्युटरवर वेब ब्राउजर ओपन करा आणि myactivity.google.comवर जा.
स्क्रीनच्या (उजव्या) बाजूला Delete Activity by यावर क्लिक करा.
किती दिवसांपूर्वीच्या एक्टिव्हिटीज डिलीट करायच्या आहेत त्या ऑप्शनची निवड करा ; शिवाय All time हा पर्याय वापरून सगळ्या एक्टिव्हिटीजही डिलीट करता येतात.
ड्रॉप डाउन मेन्यूमध्ये जाऊन Voice and audio हा पर्याय निवडा.
या नंतर पॉप-अप मेन्यू येईल; तिथे Delete हा पर्याय निवडा.

स्मार्टफोनवरून ‘अशा’ डिलीट करा व्हॉईस कमांड्स –

गुगल अ‍ॅप उघडल्यावर स्क्रीनच्या खाली असणाऱ्या more या पर्यायावर टॅप करा.
search activity वर टॅप करा.
यामुळे तुम्ही myactivity.google.com वर जाल.
डाव्या बाजूला वरती तीन रेषा असलेल्या पर्यायावर टॅप करा आणि Delete Activity by हा पर्याय निवडा.
वेब ब्राउजरप्रमाणे इथेही voice and audio हा पर्याय दिसेल.
Delete हा पर्याय निवडा.