भारतीय सैन्याचे रक्त लागलेली पाकिस्तानची साखर कशी खायची ?

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

आज या देशामध्ये पाकिस्तान मधून साखर आली आहे, या देशातल्या लाखो-करोडो शेतकऱ्यांनी ऊस पिकवला, आज त्या उसातून साखर मोठ्या प्रमाणात या देशात निर्माण झाली आहे. ती गोडाऊन मध्ये असताना पाकिस्तान मधून साखर आणण्याचा केंद्र सरकारने जो घाट घातला आहे, त्याचा विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निषेध केला आहे.

मोदीजी जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा पाकिस्तानला लव्हलेटर न लिहता ५६ इंचाची सीना दाखवावा लागेल अस म्हणत होते आज तो ५६ इंचाचा सीना १२ इंचाचा झाला आहे काय ? असा सवाल उपस्थित करतानाच पाकिस्तान रोज सरहद्दीवर आपल्या जवानांचा खून करतोय, रक्त सांडतोय तो पाकिस्तान आज आपल्या देशात साखर पाठवतोय अन ती साखर आम्ही गोड म्हणून खायची का असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्या साखरे मध्ये देशातील लाखो सैनिकांचे रक्त आहे म्हणून आम्हाला एक कण ही साखर नको असे ते म्हणाले.

ज्या देशातील जनतेने तुमच्यातील देशप्रेम पाहून तुम्हाला निवडून दिले त्यांना आता मोदींचे देशप्रेम दिसू लागले असल्याचा टोला ही त्यांनी लगावला आहे.