दातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आजकाल दाताच्या समस्यांचे प्रमाण वाढत आहे. दात चांगले असतील तर आपले आरोग्य चांगलेच राहते. दात सुंदर असतील, तर व्यक्तीचा चेहरा आकर्षिक वाटतो. मात्र दात हे केवळ सुंदरतेसाठीच महत्वाचे नसून पचनक्रिया, चर्वणक्रियेसाठी सुद्धा महत्वाचे आहे. त्यामुळे दातांची काळजी योग्य पद्धतीने घेणे आवश्यक आहे.

अशी घ्या दातांची काळजी-
सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी दात घासणे व जेवल्यानंतर गुळण्या करणे आवश्यक आहे. दात नियमित घासावे, हे करत असताना ब्रशचा वापर वेगात केला, तर दात साफ होतात, असा लोकांचा गैरसमज आहे. मात्र, अशाप्रकारे ब्रशचा वापर केल्यास दातावरचे इनमॅल निघून जाते. त्यामुळे दातांच्या सेन्सिटीव्हीटीची समस्या उद्भवते.

दातांचे आरोग्य बिघडविणारे पदार्थ खाणे टाळावे. चॉकलेट, बिस्किटे, सोडा या पदार्थांच्या अतिसेवनाने दातांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. तसेच, पिष्टमय पदार्थही दातांचे आरोग्य बिघडविते. त्याऐवजी तंतुमय भाज्या, ताजी फळे, गाजर आदींचा आहारात समावेश केल्याने दातांचे आरोग्य चांगले राहते.

वर्षभरात एकदा डेंटिस्टकडे जावून दात स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे दातांवर असलेली घाण, हिरड्यांच्या समस्या (हिरड्यातून रक्त येणे, सूज येणे, कमजोर होणे, दात हलणे) याच बरोबर दातांना कीड लागणे, आदी समस्या उद्भवत नाही. तर एक किंवा त्यापेक्षा जास्त दात नसणे हेही आरोग्यासाठी चांगले नसते. यामुळे चर्वण क्रियेवर परिणाम होतो व पचनशक्ती कमी होते. दात जर किडलेला असेल तर रेस्टोरेटीव्ह सिमेंट्स किंवा रुट कॅनॉल ट्रिटमेंटने ते व्यवस्थित केले जातात. दात हलत असेल तर तो काढून नवीन दात बसविता येतो.

अशी घ्या लहान मुलांच्या दातांची काळजी-
सहा महिन्यापासून ते एक वर्षांपर्यंत हे दात कधीपण येऊ लागतात. मुले ३ ते ४ वर्षांची होईपर्यंत या दातांची वाढ सुरू असते. बाळाला एकूण २० दुधाचे दात येतात. कायमचे दात (पर्मंनंट टीट) येण्यास सुरुवात होते. त्यानंतर दुधाचे दात हळूहळू पडू लागतात. अंदाजे १० ते १३ वर्षांपर्यंत लहान मुलांचे संपूर्ण दुधाचे पडून जातात.

बाळाला पहिला दात आल्यानंतर त्यांची तपासणी डेन्टिस्टकडे जावून करून घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे बाळाच्या दाताच्या स्वच्छतेबाबत व त्याच्या आहाराबाबत योग्य मार्गदर्शन मिळू शकते. त्यामुळे बाळाच्या तोंडातील स्वच्छतेविषयी अधिक जागरुक राहण्यास मदत मिळते. बाळाच्या दाताची योग्या निगा राखण्यासाठी ते एक वर्षाचे होइपर्यंत त्याच्या हिरड्या व दात ओलसर रुमालाने स्वच्छ पुसून घेणे गरजेचे ठरते.

बाळाला झोपेत स्तनपान अथवा बाटलीने दूध पाजू नये. कारण, त्यामुळे ते दूध त्याच्या तोंडातील पोकळीत तसेच दातांमध्ये अडकून दात किडण्याची शक्यता असते, असे झाल्यास समोरचे दात खराब होतात.