सावधान ! पेस्ट कंट्रोल करत असाल तर ‘ही’ काळजी घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरात ढेकणे, झुरळ झाल्याच्या घटनेने अनेकदा पेस्ट कंट्रोल करण्याकडे नागरिकांचा ओढा असतो. त्या वेळी पेस्ट कंट्रोल करणाऱ्यांकडून औषध फवारणी करण्यात येते. मात्र, ही औषध फवारणी करणाऱ्यांकडून अनेकदा काळजी काय घ्यायची किंवा कशी घ्यायची याची माहिती दिली जात नाही. त्यामुळे नागरिकांची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

पेस्ट कंट्रोल करताना योग्य खबरदारी न घेतल्याने होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर किमान आठ तास घराबाहेर राहून फरशी पुसून घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अनेकदा याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. गेल्या दोन ते तीन वर्षांत पेस्ट कंट्रोल केल्यानंतर गुदमरून दोन ते तीन जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सिंहगड, कोथरूड आणि बिबवेवाडी येथे या तीन घटना घडल्या आहेत.

अशा प्रकारे घ्या काळजी
पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरातील खोल्या बंद कराव्यात.
काही तासानंतर खोल्यांचे दरवाजे, खिडक्या उघडाव्यात.
वास गेल्यावरच घरात प्रवेश करावा.
घरातील भांडी, डबे स्वच्छ धुवून घ्यावीत.
सर्व खोल्यातील पंखे सुरू करावेत.

पेस्ट कंट्रोलमध्ये जास्त तीव्रतेचे रासायनिक पदार्थ वापरले गेल्यास आणि अशा वेळी घरातच थांबल्यास श्वासोच्छवास घेणे अवघड असते. हृदयाचे ठोके कमी-जास्त होऊन मृत्यू होण्याचा धोका असतो म्हणून पेस्ट कंट्रोल करताना काळजी घेण्याचा वारंवार सल्ला दिला जातो. पेस्ट कंट्रोल करताना लहान मुलांना त्यापासून बाधा होण्याची शक्यता असते तसेच श्वसनाची समस्या असलेल्या लोकांना यामुळे त्रास होऊ शकतो म्हणून विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.