…अन् त्याचवेळी ठरले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच !

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात पार पडलेली 2019 मधील विधानसभा निवडणूक कायम लक्षात राहणार आहे. तब्बल महिनाभर चाललेल्या गोंधळात वाटाघाटीत तसूभरही माघार घेणारी शिवसेना मुख्यमंत्रीपदासह सत्तेत विराजमान झाली. निकाल लागल्यापासून ते सत्ता स्थापन होण्यापर्यंतच्या अनेक घटना पडद्यामागे घडल्या. सत्तेच्या वाटाघाटी सुरू असताना मुख्यमंत्री पदासाठी अनेक नावे चर्चेत होती. मग अचानक उद्धव ठाकरेंचे नाव कसे समोर आले एका पुस्तकातून उघड झाले आहे.

पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी ‘चेकमेट’ पुस्तकातून निवडणूकांचा मागोवा घेतला आहे.. त्यातच मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव निश्चित कसे झाले याबाबत प्रसंग सांगितलेला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजपापासून दूर झाली. त्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस असे राजकीय समीकरण मूळ धरू लागले. ‘11 नोव्हेंबर 2019 रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वांद्रेतील ताज लँडस् एंड हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे व दिलीप वळसे-पाटील हे उपस्थित होते. त्या बैठकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याबद्दल चर्चा झाली. हे सरकार स्थापन होईल याबद्दल शरद पवारांना खात्री होती. पण, त्यांच्या मनात मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल विचार सुरू होता,’ त्यानंतर त्यांनी आग्रह करीत उद्धव ठाकरे यांना गळ घातल्याचे पुस्तकात म्हटले आहे.