अवघ्या 4 महिन्यांत कसा पूर्ण होणार 11 वी चा अभ्यास ?, सर्वच जण संभ्रमात

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसापासून ज्याची प्रतीक्षा होती त्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र आतां एक नवे आव्हान समोर आले आहे. ते म्हणजे शैक्षणिक वर्ष संपायला अवघे ३ ते ४ महिने शिल्लक असल्याने अभ्यासक्रमाचे नियोजन कसे असणार? याचे. बारावीचा अभ्यासक्रम व वर्ष केव्हा सुरू होणार? ४ महिन्यांत बारावीचा पाया असणाऱ्या अकरावी अभ्यासक्रमाचे मूल्यमापन कसे करणार, या साऱ्यांविषयी अनेक प्रश्न कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षक तसेच पालक, विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.

शिक्षण विभागाकडून काहीच नियोजन नाही
मराठा आरक्षण प्रश्नामुळे अकरावीसह सर्वच शैक्षणिक प्रक्रिया थांबविण्यात आल्या हाेत्या. मात्र एसईबीसी आरक्षण वगळून सर्व प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय शासनाकडून जारी झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. प्रवेशप्रक्रिया संपवून महाविद्यालये सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षासाठी केवळ तीन ते चार महिने विद्यार्थी, शिक्षकांच्या हातात असतील. एवढ्या कमी कालावधीत वर्षभराचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. तर यासाठी शिक्षण विभागाकडून काहीच नियोजन का नाही, असा प्रश्न काही शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला.

पूर्वतयारीची गरज
प्रवेशाच्या विलंबाची माहिती शिक्षण विभागाला असतानाही त्यांनी यासंबंधी नियोजन, मूल्यमापन कसे असेल, अभ्यासक्रम काय व कसा शिकवणार याची पूर्वतयारी करणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया अद्याप अकरावीत प्रवेश न झालेल्या सुमित खांडेकरच्या वडिलांनी दिली. शिक्षण विभागाने आता तरी या विद्यार्थ्यांचे अकरावी व बारावीच्या शैक्षणिक वर्षाच्या बाबतीत नियोजन करावे, असे मत शिक्षकही व्यक्त करत आहेत