एचआर प्रमुखानेच घातला कंपनीला ९२ लाखांचा गंडा

वृत्तसंस्था : एका मोठ्या वस्त्रोद्योग कंपनीच्या एच.आर प्रमुखानेच कंपनीला तब्बल ९२ लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती समाजसेवी संस्थाच्या नावाने असलेल्या खोट्या खात्यांमध्ये रक्कम वळवायचा. नितीन बोराडे असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. नितीन बोराडे हा घोटाळा २०११ पासून करीत असल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संबंधित कंपनीत नितीन बोराडे २७ वर्षांपासून कार्यरत आहे. २०११मध्ये कंपनी सोडून गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांची पगाराची खाती बंद करण्याऐवजी बोराडेने सुरूच ठेवली. ते दोघंही कंपनीचे कर्मचारी असल्याचे दाखवत बँकेला त्यांचा पगार देण्यास सांगितले. त्यांचा पगार झाला की तीच रक्कम बोराडे दोन समाजसेवी संस्थाच्या नावाने असलेल्या खोट्या खात्यांमध्ये वळवायचा. नंतर चेकनी त्या खात्यातून ती रक्कम काढून घ्यायचा. हा प्रकार बोराडे सात वर्षं करत होता. ६७ चेक देऊन त्याने तब्ब्ल ९२ लाख रुपये इतकी रक्कम घशात घातली.

२०१८ नोव्हेंबरमध्ये कंपनीच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पगारवाटपामध्ये काहीतरी गफलत असल्याचे लक्षात आले. कंपनी सोडून गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांना पगार कसा काय होतोय हा प्रश्न त्यांना पडला. तेव्हा तपास केला असता हा घोटाळा उघडकीस आला. नितीन बोराडेला पैसे काढताना रंगे हात पकडण्यात आले. पोलिसांनी बोराडेला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान संबंधित माजी कर्मचाऱ्यांनी या प्रकाराची आम्हाला काहीच माहिती नाही असं सांगितलं आहे तर, या घोटाळ्यात ते दोन कर्मचारीही सहभागी आहेत असा आरोप बोराडेने केला आहे.