कोरोना व्हायरसमुळे जाऊ लागल्या नोकर्‍या, ‘या’ बँकेतून काढण्यात येणार 35000 कर्मचारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध, ब्रिटनचे यूरोपीय संघातून बाहेर पडणे आणि चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरल्याने हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन (एचएसबीसी) बँक आता संकटात सापडली आहे. आता बँकेने मोठ्या प्रमाणात कर्मचार्‍यांच्या कपातीचा निर्णय घेतला आहे.

हाँगकाँग शाघाय बँकिंग कॉर्पोरेशन (एचएसबीसी) ने मंगळवारी आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करण्याची घोषणा केली. या अंतर्गत 35,000 कर्मचार्‍यांची कपात केली जाणार आहे. लागोपाठ तीन वर्षापासून कंपनीच्या नफ्यात घट झाल्याने बँकेने हा निर्णय घेतला आहे.

बँकेचे म्हणणे आहे की, बँक आता आपला युरोप आणि अमेरिकेतील विस्तारही कमी करणार आहे. अमेरिका-चीनमध्ये सुरू असलेले व्यापार युद्ध, ब्रिटनचे यूरोपीय संघातून बाहेर पडणे आणि चीनमधील कोरोना व्हायरसच्या संकटामुळे बँकेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी बँक आपल्या खर्चात कपात करण्याकडे लक्ष देणार आहे.

परंतु, चीनमध्ये चांगली स्थिती असून आशियामधील बँकेचा कारभार चांगला सुरू आहे. परंतु, तिचा अमेरिका आणि युरोपमधील व्यवसाय निराशाजनक आहे. मागील वर्षी बँकेच्या प्रॉफिटमध्ये एक तृतीयांश घट झाली होती.

बँकेनं म्हटले की, 2022 पर्यंत खर्चात सुमारे 32 हजार करोडची कपात करण्याची योजना आहे. जास्तीत जास्त कपात ही अमेरिका आणि यूरोपीय व्यवसायात होईल. अमेरिकेमध्ये बँकेने ब्रांचची संख्या 30 टक्क्यांनी कमी करण्याची योजना आखली आहे.

बँकेचे काळजीवाहू मुख्य कार्यकारी अधिकारी नोएल क्युइन यांनी सांगितले की, आमच्या व्यवसायात काही भागात अपेक्षेप्रमाणे फायदा होत नसल्याने गुंतवणुकदारांना चांगले परिणाम देण्यासाठी आम्ही आमच्या योजनेवर पुनर्विचार करत आहोत.

ते म्हणाले की, पुढील तीन वर्षात बँक आपल्या कर्मचार्‍यांची संख्या 2,35,000 वरून कमी करून 2,00,000 करणार आहे. परंतु, त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली नाही. बँकेच्या पुनर्बांधणीची योजना 2012 पासून त्यांची महत्वाकांक्षी योजना आहे.

यापूर्वी 2016 मध्ये बँकेने जागतिक स्तरावर आपला खर्च कमी करताना भारतातील शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. भारतातील अनेक मोठ्या शहरात बँकेच्या शाखा आहेत.