बजरंग सोनवणेंना उमेदवारी दिल्याने अमरसिंह पंडित समर्थकांमध्ये संताप, गेवराईतील बैठक रद्द

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीडमध्ये बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे.  यानंतर आता पंडित समर्थक मात्र नाराज असल्याचे दिसत आहे. गेवराई येथे आज (शनिवार दि- 16) सायंकाळी आयोजित केलेली पक्षाची बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पंडित समर्थकांमध्ये फेसबुकच्या माध्यमातून संताप व्यक्त केला जाताना दिसत आहे.

अमरसिंह पंडित यांचे बंधू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. त्यामुळे तर वातावरण अधिकच तापल्याचे दिसत आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं.” अशी पोस्ट विजयसिंह पंडित यांनी सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फेसबुकवर शेअर केली होती. त्यांच्या या पोस्टमुळे पंडित यांच्यातील नाराजी समोर आली आहे. त्यामुळे बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची गेवराई येथे होणारी बैठक रद्द करण्याची वेळ आली असल्याचे समजत आहे.

दरम्यान, अमरसिंह पंडित यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. त्यात बीड मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बजरंग सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने अमरसिंह पंडित गटाला मोठा धक्का बसला. त्यामुळे पंडित समर्थकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना तिकीट मिळालं, अशी चर्चा सध्या सुरु आहे. बीडमधून राष्ट्रवादीकडून माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या नावाची चर्चा होती. परंतु क्षीरसागर हे भाजपच्या वाटेवर असल्याने त्यांच्या नावाची चर्चा मावळली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us