‘त्या’ वक्तव्यावर रितेश देशमुखचं पियुष गोयल यांना सडेतोड उत्तर, म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंजाबमधील निवडणुक प्रचारात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी ओबेरॉय हॉटेलबाहेर काँग्रेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे एका निर्मात्याला घेऊन उभे होते. त्यांना चित्रपटात आपल्या मुलाला रोल मिळवून देणे अधिक महत्वाचे होते, अशी वादग्रस्त टिका केली आहे. या टिकेला अभिनेते रितेश देशमुख यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यावर टिका करण्याचा तुमचा अधिकार आहे. पण जे तुम्हाला उत्तर देण्यास हयात नाहीत, त्यांच्यावर टिका करण्यात चुक आहे. टिका करण्यास तुम्ही ७ वर्षे उशीर केलात, अशा बोचऱ्या शब्दात रितेशने उत्तर दिले आहे. दहशतवादाचा आम्हीच कसा मुकाबला करु शकतो, हे सांगताना पंतप्रधानांनी थेट राजीव गांधी यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांचे मंत्रीही आता त्यावर कडी करु लागले आहेत.

पंजाबमधील लुधियानातील एका प्रचार सभेत पियुष गोयल म्हणाले की, मी मुंबईहून आलो आहे. तुम्हाला मुंबईवरील २६/११ चा हल्ला लक्षात असेल. तत्कालीन काँग्रेसचे सरकार कमजोर होते आणि काहीच करु शकले नाही. ओबेरॉय हॉटेलमध्ये गोळीबार आणि स्फोट सुरु असताना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख एका निर्मात्याला घेऊन बाहेर उभे होते. मुख्यमंत्र्यांना मुलाला चित्रपटात भूमिका मिळवून देणे महत्वाचे होते.

यावर रितेश देशमुख यांनी ट्विटद्वारे उत्तर दिले. ते म्हणाले की, ताज/ ओबेरॉय हॉटेलमध्ये मी गेलो होतो, या तुमच्या दाव्यात तथ्य असले तरी गोळीबार आणि स्फोटाच्या वेळी मी तिथे उपस्थित असल्याचा तुमचा आरोप चुकीचा आहे. मी माझ्या वडिलांसोबत गेलो, हे खरं आहे. मात्र ते मला सिनेमात रोल देण्यासाठी धडपडत होते, हे तथ्यहीन आहे. ते कधीच कुठल्या निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला मला सिनेमात भूमिका देण्याविषयी बोलले नाहीत, याचा मला अभिमान वाटतो. तुम्हाला मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मात्र, स्वत: वरील आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी ते हयात नाहीत. त्यांच्यावर टिका करणे चुकीचे आहे. तुम्ही थोडासा उशीर केलात. नाही तर त्यांनी नक्कीच तुम्हाला उत्तर दिले असते.