मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला, म्हणाले – ‘काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालकांकडून हिंदुत्व समजून घ्यावं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मंदिरं खुली करण्यावरुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांना पत्र लिहित राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी हिदुत्वावरुन डिवचले होतं. त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी उत्तर दिलं होतं. त्यानंतर आज दसऱ्या मेळाव्यात (dasara melava) उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी राज्यापालांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावं, असा टोला त्यांनी लगावला.

मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या वतीने दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 50 पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदा हा सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थिती साजरा झाला. यावेळी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील भाजपवर हल्लाबोल केला.

हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात, का तर मंदिरं उघडले नाहीत म्हणून… पण आम्हाला कोण विचारतेय… ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते. घंटा बडवा, थाळ्या बडवा, हे तुमचं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या. संजयजी उद्याच्या सामनात सरसंघचालकांचं भाषण व्यवस्थित आलं पाहिजे. काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्याव, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

You might also like