Latur News : गंजगोलाईतील ऑइल पेंटच्या गोदामाला भीषण आग

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील गंजगोलाई परिसरातील एका ऑइल पेंट गोडाऊनला शुक्रवारी (दि. 29) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत गोडाऊन मधील ऑईलपेंटचे डबे मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत पाच बंबानी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र गोडाऊनचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत नेमके किती नुकसान झाले याची माहिती समजू शकली नाही.

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गंजगोलाई परिसरात कमलकिशोर अग्रवाल यांचे चार मजली गोयल ट्रेडर्स नावाचे ऑईलपेंटचे गोडाऊन आहे. याच गोडाऊन परिसरात शहराची मुख्य बाजारपेठ आहे. अचानक दुपारी या इमारतीच्या चौथ्या मजल्यात आग लागली. आगीमुळे धुराचे लोट पसरले होते. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले.

तोपर्यंत चौथ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यापर्यंत आग पसरली होती. त्यांनी पाच बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. दरम्यान, गंजगोलाईमधील सराफ लाईन, मिरची लाईनचा परिसर पोलिसांनी सील करून वाहतुकीस बंद केला होता. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या पथकाला यश आहे. पूर्ण आग आटोक्यात आल्यानंतर नुकसानीचा पंचनामा होणार आहे.