…म्हणून फेअर अ‍ॅण्ड लव्हली मधून ‘फेअर’ झाले गायब

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जाहिरातीमधून रंगभेद होत असल्याची टीका होत असल्यामुळे ‘फेअर अँड लव्हली’मधून अखेर फेअर हा शब्द काढण्यात आला आहे. फेअर अँड लव्हलीची निर्मिती करणार्‍या हिंदुस्थान युनिलिव्हरने फेअर अँड लव्हलीच्या नावात बदल करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता कंपनीने ‘फेअर’ शब्द हटवला आहे.

फेअर शब्दाऐवजी ‘ग्लो’ शब्दाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे आता ‘ग्लो अँड लव्हली’ या नावाने क्रीमची विक्री होईल. हिंदुस्थान युनिलिव्हरने पुरुषांच्या क्रीमचे नावही बदलले असून यापुढे ‘ग्लो अँड हँडसम’ नावाने पुरुषांच्या क्रीमची विक्री होईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये ‘ग्लो अँड लव्हली’ क्रीम रिटेल दुकानांमध्ये उपलब्ध होणार आहे. यापूर्वी 25 जून रोजी कंपनीने फेअरनेस क्रीम ‘फेअर अँड लव्हली’मधून फेअर हा शब्द वगळणार असल्याचे सांगितले होते.

त्यावेळी ब्रॅण्डमधून फेअर, फेअरनेस, व्हाइट, व्हाइटनिंग, लाइट, लाइटनिंग हे शब्दही काढणार असल्याचे स्पष्ट केले होते. गोरे होण्यासाठी या क्रीमचा वापर करा अशी जाहिरात करत असल्याने वारंवार फेअर अ‍ॅण्ड लव्हली ब्रॅण्डवर टीका झाली होती. जाहिरातीमधून रंगभेद होत असल्याची टीकाही वारंवार झाली. अनेक सेलिब्रिटींनी याच कारणामुळे जाहिरात करण्यास नकारही दर्शवला होता. शिवाय, काही दिवसांपूर्वी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यानंतर ‘ब्लॅक लाइव्स मॅटर’ या आंदोलनाने जोर पकडला आणि वर्णद्वेषी फेअरनेस क्रिम्स बनवणार्‍या कंपन्याही आंदोलनकर्त्यांच्या निशाण्यावर आल्या होत्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like