Pimpri : भोसरीत सुलभ शौचालयाच्या टाकीत सापडला मानवी सांगाडा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भोसरीतील बालाजीनगरमधील एका सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत मानवी शरीराच्या काही भागाची हाडे सापडली आहेत. त्यात मानवी कवटी आणि इतर भागांचा समावेश आहे. सोमवारी (दि. 16) सायंकाळी ही घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मानवी सांगाड्याची ओळख अद्याप पटली नसून, खून करून मृतदेह टाकीत टाकल्याचा संशय पोलिसांना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरीतील बालाजीनगरमध्ये असलेल्या सुलभ शौचालयाच्या हौदात दोन मुले मासे पकडत होती. तेव्हा, त्यांना एका प्लास्टिकच्या पिशवीत कवटीसह हाडे आढळून आली. या घटनेचा तपास सुरू असून, सापडलेली हाडे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. त्यानंतर योग्य ती पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवारे यांनी दिली आहे.

हाडे बाहेरून आणून तिथे टाकल्याचा संशय पोलिसांना असून, इतर हाडांचा शोध घेतला जात आहे. याशिवाय परिसरात कोणी बेपत्ता आहे का? याचादेखील पोलीस शोध घेत आहेत. तसेच या घटनेबाबत स्थानिकांकडे चौकशी केली जात आहे. सीसीटीव्हीचीही मदत घेतली जात आहे. कवटी आणि हाडे पुरुषाची आहेत की महिलेची हे अद्याप समजू शकलेले नाही. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.