मानलं देवा ! मुस्लिमांनी गाव सोडलं पण हिंदू तरुण करतो मशिदीची ‘देखभाल’, नमाज ‘पठण’

पाटणा : वृत्तसंस्था – देशभरात सध्या धर्मावरून विभाजन होत असताना बिहारमधील एका युवकाने मात्र सर्वधर्म समभाव काय असतो याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. अजय पासवान असे या तरुणाचे नाव. अजय बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील मारी या गावात राहतो हे गाव म्हणजे जेमतेम ३००० लोकसंख्या असलेलं गाव. पण अजय या गावातल्या मशिदीची गेल्या १० वर्षांपासून देखभाल करतो. पण असे करीत असताना मात्र हिंदू धर्माची देखील तितकीच तो जाण ठेवून आहे. धर्माच्या नावावर वादंग उठवणाऱ्यांना अजय एक उत्तम उदाहरण ठरू शकतो.

नक्की काय आहे अजयची कहाणी

इतर गावाप्रमाणे बिहारच्या मारी गावात देखील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदाय एकत्र राहतात. या गावतील अनेक कुटुंब रोजगाराच्या शोधात हे गाव सोडून गेली. यात गावातील मुस्लिम कुटुंबांचा देखील सहभाग होता. गावातील मुस्लिम कुटुंब गाव सोडून गेल्यावर या मशिदीत कोणच जाईना असे झाले. काही दिवसांनी ही मशीद म्हणजे दारुड्यांचा आणि रिकामटेकड्या लोकांचा अड्डा बनली. यावेळी आजय केवळ २० वर्षांचा होता. गावातील इतर मंदिरांमध्ये मात्र रोजच्या रोज स्वछता व्हायची देवाची पूजा व्हायची पण गावातील मशीद मात्र दारुड्यांचा अड्डा बनली होती. ही गोष्ट अजयला खटकत होती. तेव्हा त्याने स्वतःच्या इच्छेने मशिदीची देखभाल करायची जबाबदारी हाती घेतली. याची सुरुवात मशिदीतून दारुड्यांना बाहेर काढण्यापासून झाली. मशिदीची साफसफाई झाली.

त्याने गावातील इतर मित्रांच्या मदतीने मौलवींकडून अजाणचे रेकॉर्डिंग केले. इतकेच नव्हे तर नमाज पठण कसे करायचे हे देखील त्याने शिकून घेतले. आता या मशिदीत रोज पाच वेळ नमाज पठण केले जात होते. मात्र याबाबत अजयचे म्हणणे होते की , गावात मुस्लिम लोक नसले तरी माणसं आहेतच की, हिंदू असलो म्हणून काय झालं? अल्लाह त्याची पूजा करायला मना करणार आहे का? तेव्हापासून आजतागायत अजय या मशिदीची देखभाल करतो. त्याला अनेकांनी याबाबत प्रश्न देखील केले मात्र त्याने आपले तत्व सोडले नाही. विशेष म्हणजे मशिदीची देखभाल आणि नमाज पठण करीत असताना तो हनुमान चालिसा देखील विसरला नाही. तो मंदिरातही जातो आणि पूजाही करतो. आता त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/